मुंबईः उद्वाहनात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला चारकोप पोलिसांनी गुरुवारी अटक केली. आरोपीविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी चारकोप पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा – मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : एका वर्षात दुसऱ्यांदा निवडणूक स्थगित, विद्यार्थी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण

हेही वाचा – बोरिवलीमध्ये डंपरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

१२ वर्षांच्या पीडित मुलीला वडिलांनी जेवणासाठी तेल आणण्यासाठी पाठवले होते. पीडित मुलगी गुरुवारी दुकानातून तेल घेऊन आली. त्यावेळी उद्वाहनातून घरी जात असताना आरोपी सुरक्षा रक्षक मुलीशी बोलण्याच्या बहाण्याने उद्वाहनात शिरला. त्यानंतर त्याने तिचा विनयभंग केला. या घटनेमुळे पीडित मुलगी घाबरली. तिने हा प्रकार आईला सांगितला. आईने याप्रकरणी चारकोप पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७४ व पोक्सो कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी इमारतीचा सुरक्षा रक्षक घटनेनंतर विरारला पळून गेला होता. त्याच्या शोध घेण्यासाठी एक पथक विरारला पाठवण्यात आले. त्यांनी आरोपीला पकडून चारकोप पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली.