मुंबई : सुमारे एक कोटी रुपये किंमतीच्या सोन्याच्या दोन लगड घेऊन नोकराने पलायन केल्याची घटना जुहू परिसरात घडली. याप्रकरणी नोकर प्रभूनारायण मिश्रा (२८) याच्याविरोधात जुहू पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मालाड येथील न्यू दिडोंशी ओमसाई गणेश सोसायटीमध्ये वास्तव्यास असलेले प्रवीण रामकृष्णा घाग व्यावसायिक जगदीशकुमार मदनलाल गुप्ता (७६) यांच्याकडे कामाला आहेत. जगदीशकुमार कुटुंबियांसोबत विलेपार्ले येथील जेव्हीपीडी स्किम, अग्रवाल हाऊसमध्ये वास्तव्यास आहेत. जगदीशकुमार यांच्याडेच गेल्या १८ महिन्यांपासून प्रभूनारायण मिश्रा घरकाम करीत होता. जगदीशकुमार यांनी त्यांच्या घरातील कपाटात सुमारे एक कोटी रुपय किंमतीच्या सोन्याच्या दोन लगड ठेवल्या होत्या. प्रभूनारायणने १० मे ते २० जून २०२४ या कालावधीत कपाटातून या दोन्ही लगड काढून घरातून पलायन केले होते.
दोन दिवसांपूर्वी जगदीशकुमार गुप्ता यांच्या निदर्शनास हा प्रकार आला होता. या दोन्ही लगड प्रभूनारायणने चोरल्याचा संशय व्यक्त करून त्यांनी प्रवीण घाग याला जुहू पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले होते. जगदीशकुमार यांच्या वतीने प्रवीण घाग याने जुहू पोलिसांना घडलेला प्रकार सांगून प्रभूनारायण मिश्रा याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या प्रभूनारायणचा शोध सुरू केला आहे.