मुंबई : बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना गोवंडी येथेही धार्मिक शिक्षण संस्थेत शिक्षकाने सात वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अरबी शिक्षण घेणारी पीडित मुलगी या प्रकारमुळे घाबरली होती. त्यामुळे ती दोन दिवस धार्मिक शाळेत गेली नाही. अखेर आईने तिला विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने शिवाजी नगर पोलिसांकडे तक्रार केली.
हेही वाचा – समाजमाध्यमांवरून धडे घेऊन दुचाकी चोरणारा अटकेत
हेही वाचा – भूमिगत बाजारपेठेबाबत अधिकाऱ्यांची चालढकल
पीडित मुलगी अरबी भाषेचे शिक्षण घेण्यासाठी गोवंडी येथील धार्मिक शिक्षण संस्थेत जात होती. पीडित मुलगी नेहमीप्रमाणे २२ ऑगस्ट रोजी धार्मिक शिक्षण संस्थेत गेली असता तेथील शिक्षकाने तिचा विनयभंग केला. त्यामुळे धार्मिक शिक्षण संस्थेत जाण्यास ती घाबरत होती. दोन दिवसांपासून मुलगी अरबी शिकण्यासाठी जात नसल्यामुळे आईला संशय आला. तिने विश्वासात घेऊन विचारणा केली असता शिक्षकाने केलेला प्रकार तिने आईला सांगितला. अखेर पीडित मुलीच्या ३१ वर्षीय आईने याप्रकारणी शिवाजी नगर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधपासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोकसो) गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याप्रकारणी तपास सुरू केला असून घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पीडित मुलीकडून लवकरच घटनेबाबतची माहिती घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.