मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा पक्ष प्रवेश सुरू झाले आहेत. मागाठाणे येथील शिवसेनेच्या ठाकरे गटातील दोन माजी नगरसेविकांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला.
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे थांबलेले पक्ष प्रवेश पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटातील माजी नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्याचे शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेशाला वेग येण्याची शक्यता आहे. मागाठाणे येथील प्रभाग क्रमांक ११ मधील माजी नगरसेविका रिद्धी खुरसुंगे आणि त्यांचे पती भास्कर खुरसुंगे, तसेच प्रभाग क्रमांक १२ मधील माजी नगरसेविका गीता सिंघण यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा – ‘मंत्रालय, राजभवनासमोर फेरीवाले चालतील का?’
शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या वर्षभरात मुंबईतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी एक एक करत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आतापर्यंत ३० हून अधिक माजी नगरसेवकांनी ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे.
© The Indian Express (P) Ltd