मुंबईकरांसाठी लोकलचा प्रवास हा स्वस्त आणि सोयीस्कर मानला जातो. कुठेही लवकर पोहोचण्यासाठी मुंबईकर लोकलने प्रवास करणे पसंत करतात. यातच सरकारने एसी लोकल दाखल केल्या. यामुळे मुंबईकरांना गारेगार वातावरणात प्रवास करणे आणखीनच सोपे झाले. पण याचं एसी लोकलमुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे.
ही घटना चर्चगेटवरुन विरारच्या एसी लोकलमध्ये घडली. काल सोमवार रात्री नालासोपारा रेल्वे स्थानकात चर्चगेटवरून येणाऱ्या एसी लोकलचे दरवाजे काही तांत्रिक बाबींमुळे उघडले गेले नाहीत. यावेळी फक्त गार्डच्या बाजूचे तीन दरवाजे उघडले गेले तर बाकी नऊ दरवाजे उघडलेच नाहीत. त्यामुळे नालासोपाराचे प्रवाशी थेट विरारला पोहोचले. या घटनेमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे संतप्त नालासोपारा प्रवाशांनी एसी लोकलच्या ड्रायव्हरच्या केबिनसमोर सुमारे अर्धा तास गोंधळ घातला.
ड्रायव्हरला केलं केबिनमध्ये बंद..
यावेळी संतप्त प्रवाशांनी लोकल ड्रायव्हरला घेरलं आणि त्याला केबिनमधून बाहेर येऊच दिलं नाही. सुमारे अर्धा तास प्रवाशांचा हा गोंधळ सुरू होता. यामुळे विरार स्टेशनवरील वातावरण देखील तणावपूर्ण झालं होत. प्रवाशांच्या या गोंधळामुळे बाकीच्या लोकल देखील रखडल्या होत्या. शेवटी १२.१५ ची शेवटची विरार चर्चगेट लोकल पकडून प्रवासी नालासोपाऱ्याला पोहोचले.