मुंबई : माझगाव येथील व्यावसायिकाच्या घरात बुरखा घालून शिरलेल्या आरोपीने १४ वर्षांच्या मुलीच्या डोक्यावर बंदुक लावून मौल्यवान दागिन्यांची मागणी केली. पण तक्रारदार महिलेने प्रसंगावधान दाखवून आरोपीच्या हातातील बंदुक हिसकावून घेतली. त्यानंतर आरोपीला पकडण्यात यश आले. आरोपी त्याच इमारतीत कामाला असून त्याने व्यावसायिकाला लुटण्यासाठी खेळण्यातील बंदुकीचा वापर केल्याचे पोलिसांनी सांगितले
माझगाव येथील जास्मीन अपार्टमेंटमधील १० व्या मजल्यावर व्यासायिक उमर शम्सी राहतात. शम्सी यांची पत्नी सुमेरा व मुलगी रिदा सोमवारी सायंकाळी घरी होत्या. त्यावेळी बुरखा खालून आरोपी घरात शिरला. त्याने रिदाच्या डोक्यावर बंदुक लावून घरातील मौल्यवान दागिने व मोबाइलची मागणी केली. सुमेरा यांना प्रथम कोणी मस्करी करीत असल्याचे वाटले. पण बुरख्याधारी व्यक्ती आवाजावरून पुरूष असल्याचे लक्षात येताच त्या घाबरल्या. पण त्यांनी प्रसंगावधान दाखवून दागिने दुसऱ्या घरात ठेवल्याचे सांगितले.
ब
े
दागिने आणून देण्याच्या बहाण्याने त्या आरोपी जवळ पोहोचल्या. आरोपीचे लक्ष विचलीत झाल्यानंतर सुमेरा यांनी त्याच्या हातातील बंदुक हिसकावून घेतली. त्यानंतर आरोपीने आपल्याकडे बॉम्ब असल्याचे सांगितले. त्यानंतर सुमेरा यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे आरोपी पळू लागला. सुमेरा यांचा आवाज ऐकून शेजारी धावत आले आणि त्यांनी आरोपीला पकडले. त्याचा बुरखा काढला असता ११ व्या मजल्यावर काम करणारा तौरीकुल शौदुल दलाल (३०) असल्याचे निष्पन्न झाले. अखेर पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी सुमेरा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.