मुंबई: गांजाची तस्करी करणाऱ्या एका सराईत आरोपीला मानखुर्द पोलिसांनी वाशी खाडी परिसरातून अटक केली. आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी चार किलो इतका गांजा जप्त केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
गोवंडी, शिवाजी नगर आणि मानखुर्द परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस या परिसरात रात्री मोठ्या प्रमाणात गस्त घालत आहेत. मानखुर्द पोलीस सोमवारी रात्री या परिसरात गस्त घालत होते. पोलीस शीव – पनवेल मार्गावरील वाशी खाडी पूल परिसरातून जात असताना त्यांना एक इसम संशयास्पद फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला तत्काळ थांबण्याचा इशारा केला. मात्र पोलिसांना पाहून त्याने पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांना त्याच्या जवळ एक पिशवी सापडली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी पिशवी उघडून पहिली असता त्यात चार किलो गांजा सापडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीचे नाव साकीर शेख (२२) असे असून तो मानखुर्द परिसरातील रहिवासी आहे.