मुंबई: टेलिफोनसाठी वापरण्यात येणाऱ्या केबलची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी या आरोपींकडून सव्वादोन लाख रुपय किंमतीच्या केबल हस्तगत केल्या असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
आझाद मैदान पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक लिलाधर पाटील नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ६ च्या सुमारास फोर्ट परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलिसांची गाडी पाहून एक टेम्पो अधिक वेगाने पुढे जाऊ लागला. ही बाब पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी टेम्पोचा पाठलाग केला. काही अंतरावर टेम्पो थांबवून त्यांनी झडती घेतली. टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात एमटीएनलच्या केबल ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. टेम्पोमधील दोघांची चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.
हेही वाचा – मराठी पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर, मुंबई महापालिकेचा निर्णय, १ मे पासून अंमलबजावणी
अखेर पोलिसांनी दोघाना पोलीस ठाण्यात आणून त्यांची अधिक चौकशी केली. त्यावेळी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अशोक शिंदे (४३) आणि राजकुमार यादव (२७) अशी या आरोपींची नावे असून त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी सव्वादोन लाख रुपये किंमतीच्या केबल आणि एक टेम्पो हस्तगत केला.