मुंबई : रक्तपेढ्यांनी अतिरिक्त किंमतीत रक्त विकल्याप्रकरणी रक्त संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) १ कोटी ३२ लाख ९२ हजार रुपये दंडापोटी वसूल केले आहेत. मुंबईतील २१ खासगी रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांकडून ही रक्कम वसूल करण्यात आली आहे. मात्र एका खासगी रुग्णालयाने दोन वर्षे उलटली तरी दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.
रुग्णांना अल्पदरात रक्त उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य सरकारच्या राज्य रक्त संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) रक्ताचे शुल्क निर्धारित केले होते. मात्र खासगी रुग्णालयाकडून त्याचे उल्लंघन होत असल्याने राज्य सरकारने २०१८ मध्ये अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या रक्तपेढ्यांवर चार पट दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यापूर्वी या नियमाचे उल्लंघन केलेल्या रक्तपेढ्यांचा दंडही थकला असल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे.
हेही वाचा – मुंबई : महागड्या दुचाकी चोरणाऱ्या सराईत आरोपीला अटक
एसबीटीसीने २०१४ ते २०१८ या कालावधीत अतिरिक्त किंमतीत रक्त देणाऱ्या २१ रक्तपेढ्यांकडून दंडापोटी १ कोटी ३२ लाख ९२ हजार वसूल केले. त्यात सर्वाधिक दंड हा हिंदूजा रुग्णालयाकडून ३३ लाख ३० हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे. त्याखालोखाल जसलोक रुग्णालयाकडून १७ लाख ३७ हजार रुपये, कोकीलाबेन रुग्णालय १४ लाख ७२ हजार रुपये, मुंबई रुग्णालय १२ लाख ६२ हजार रुपये, फोर्टीस रुग्णालय ९ लाख ३४ हजार रुपये इतके दंड वसूल करण्यात आले आहेत. मात्र हिंदूजा रुग्णालयाच्या एकूण दंडाच्या रकमेपैकी त्यांनी फक्त ३३ लाख भरले असून उर्वरित १५ लाख ७३ हजार ९३५ रुपयांचा दंड दोन वर्षांपासून भरलेला नाही. हा दंड भरण्यासाठी एसबीटीसीकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत असूनही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे.
एसबीटीसीने आकारलेल्या दंडामध्ये थॅलेसेमिया सारख्या रुग्णांना मोफत रक्त दिलेल्या रक्ताचा तसेच लेखा परीक्षकांनीही काही दंड पुन्हा आकारला असल्याचा दावा हिंदूजा रुग्णालयाने केला होता. मात्र एसबीटीसीने झालेली चूक सुधारल्यानंतर सुधारित दंडापैकी १५ लाख रुपये रुग्णालयाने भरले नसल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या उत्तरातून दिसते आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी ही माहिती मागितली होती.
आकारलेल्या अतिरिक्त शुल्काच्या रकमेवर २० टक्क्यांपेक्षा अधिक दंड आकारणे अपेक्षित होते. हिंदुजा आणि एसबीटीसी यांच्यातील हे प्रकरण मागील दाेन वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे आता एसबीटीसीने या दंडाच्या रकमेवर व्याज आकारून त्याची वसूली करावी, असे कोठारी यांनी सांगितले.
हिंदुजा रुग्णालयाचे म्हणणे काय?
पी.डी. हिंदुजा रुग्णालय हे दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी ओळखले जाते. उच्च दर्जाची आरोग्य सेवा पुरवण्यावर रुग्णालयातर्फे नेहमीच भर दिला जातो. त्यासाठी सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे आणि शिफारशींचे संंबधित अधिकाऱ्यांकडून काटेकाेरपणे पालन केले जाते. त्यानुसार राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या सर्व नियमांचे नेहमीच पालन केले असून, त्यांना सहकार्य केले आहे. रुग्णालयाच्या सहकाऱ्याबद्दल परिषदेकडून नेहमीच समाधान व्यक्त केले जात असल्याचे हिंदुजा रुग्णालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.