मुंबई : महानगरपलिकेने हाती घेतलेले नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात निष्काळजीपणा आणि त्रुटी आढळून आल्यामुळे पालिकेने कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नालेसफाईतील हलगर्जीप्रकरणी वेगवेगळ्या कंत्राटदारांना एकूण ५४ लाख ६८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील नद्या आणि नाल्यांमधील गाळ काढण्यात येत आहे. मात्र, अनेकदा कंत्राटदारांकडून कामात हलगर्जीपणा केला जातो. परिणामी, मुंबईकरांना पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यंदा नालेसफाईचे काम अधिक प्रभावी व पारदर्शक पद्धतीने पार पाडावे, यासाठी पालिकेने नालेसफाईच्या कंत्राटात काही नव्या अटींचा समावेश केला आहे. मात्र, तरीही काही कंत्राटदारांकडून नालेसफाईच्या कामांत निष्काळजीपणा करण्यात आल्याचे निदर्शनास आले. नालेसफाईत कोणताही निष्काळजीपणा होऊ नये यासाठी कामात हलगर्जी करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला.
मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांतील कंत्राटदारांना एकूण ५४ लाख ६८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पालिका प्रशासनाने शहर विभागातील नालेसफाई निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांना ३१ लाख ६५ हजार दंड ठोठावला आहे. तसेच, पूर्व उपनगरात २२ लाख ५५ हजार तर, पश्चिम उपनगरातील कंत्राटदारांवर १० लाख ४८ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कंत्राटदारांकडून ज्यावेळी कामाचे बिल जमा केले जाईल, त्यावेळी बिलामधूनच दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा – परदेशात नोकरी देण्याचे अमिष दाखवून तरुणाला अडीच लाखाना गंडा
पालिकेच्या आर उत्तर विभाग कार्यालयावर ठाकरे गटाचा मोर्चा
दहिसर विभागातील खराब रस्ते, रस्त्यांची अर्धवट कामे, वाहतूककोंडी, नालेसफाईतील त्रुटींविरोधात शिवसेना कार्यकर्त्यांनी (ठाकरे गट) पालिकेच्या आर उत्तर विभाग कार्यालयावर बुधवारी धडक मोर्चा काढला. शिवसेना उपनेते व माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. दहिसर पूर्व आणि पश्चिमेतील अनेक परिसरात कायम वाहतूककोंडी असते. तसेच, नागरिकांना स्वच्छ, निरोगी हवाही मिळत नाही. दरम्यान, विनोद घोसाळकर यांनी दहिसरमधील रस्ते व नाल्यांची पाहणी केली. त्यावेळी अनेक ठिकाणच्या कामांत हलगर्जीपणा दिसून आल्यामुळे महापालिकेच्या कारभारावर घोसाळकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
याच पार्श्वभूमीवर, बुधवारी पालिकेच्या आर उत्तर विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दहिसर पूर्व येथील आनंदनगर मेट्रो स्टेशन जवळच्या शिव मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. यावेळी महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या. पालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करून पालिकेचा निषेध करण्यात आला. मुंबई महापालिकेकडून नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असताना नालेसफाई योग्यरीत्या होत नाही. संपूर्ण दहिसरमधील नाल्यांची पाहणी केली असता तेथील गाळ उचलण्यात आलेला नाही, असा आरोप घोसाळकर यांनी केला.
© The Indian Express (P) Ltd