मुंबईः चार महिन्यांच्या बालकाला दुर्धर आजार असल्याचे भासवून तिच्या उपचाराच्या नावाखाली साडेचार कोटी रुपयांची फसणूक करण्यात आल्याचा आरोपखाली माटुंगा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी अभिनेत्री सना खानच्या इन्स्टाग्रामवरून त्याबाबत पोस्ट करून मदतीचे आवाहन केले होते. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी फसवणूक, कट रचणे व बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : मुंबई : ७० वर्षांच्या व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी तीन वर्षांनंतर हत्येचा गुन्हा दाखल
याप्रकरणीतील तक्रारदार आरिफ अहमद मन्सूर अहमद शेख (५२) हे माहीम येथील रहिवासी आहे. त्यांच्या तक्रारीवरून माटुंगा पोलिसांनी निखत खान, नौफिल काझी व पियुष जैन अशा तिघांविरोधात भादंवि कलम ४२०, ४०६, १२० (ब), ४६५, ४६७, ४६८, ४७१ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी चार महिन्यांच्या बाळावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे भासवले होते. जानेवारी महिन्यात त्याला सुरूवात झाली होती. त्या बाळाला स्पाइनल मस्कुलर एट्रोपी हा आजार झाला असून त्याच्या वैद्यकीय खर्चासाठी १७ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे आरोपींनी भासवले. त्यासाठी अभिनेत्री सना खानच्या इन्स्टाग्राम खात्यावरून ११ जानेवारीला नागरिकांना मदतीचे आवाहनही करण्यात आले होते. जमा झालेले सुमारे साडेचार कोटी रुपये त्या बालकाच्या उपचारासाठी वापरले नाहीत, असा आरोप तक्रारदाराने केला आहे. याप्रकरणी तक्रारदार शेख यांनी कुर्ला न्यायालयात तक्रार केली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार माटुंगा पोलिसांंनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा : मुंबई: गोवंडीत बनावट नोटांसह एकाला अटक
फसवणुकीच्या आरोपाचे कंपनीकडून खंडन
दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या चार महिन्यांच्या बालिकेच्या उपचारासाठी जमा करण्यात आलेली रक्कम हडप केल्याचा आरोप इम्पॅक्टगुरू या क्राउड फंडिंग मंचावर करण्यात आला आहे. कंपनीने हे आरोप फेटाळून लावले असून हे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. हे आरोप केवळ खोटेच नाहीत तर निष्काळजीपणाचेही आहेत. त्यामुळे आपले जीवन वाचवण्यासाठी या फंडरेझिंगवर अवलंबून असणाऱ्या एका निरागस मुलीच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. त्यांना त्वरित आणि महागड्या उपचारांची आवश्यकता आहे. एका छोट्या मुलीवर नामांकीत रग्णालयात उपचार सुरू असून तिच्या झोलगेन्स्मा जीन थेरेपी औषधाची किंमत १० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. फंडरेझिंग अभियानाची रक्कम साडेचार कोटी रुपये असून तिचा गैरवापर केल्याचे आरोप पूर्णपणे खोटा आहे. आजपर्यंत या फंडरेझिंग अभियानाने इम्पॅक्ट गुरूवर २.२ कोटी रुपये उभे केले आहेत. हे पैसे सुरक्षित असून केवळ या मुलीच्या उपचारासाठी राखून ठेवले आहेत. त्यातील काही रक्कम रिस्डिप्लम औषधासाठी आधीच वापरली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. चार महिन्यांच्या बालकाला दुर्धर आजार असल्याचे भासवून तिच्या उपचाराच्या नावाखाली साडेचार कोटी रुपयांची फसणूक करण्यात आल्याच्या आरोपखाली माटुंगा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी अभिनेत्री सना खानच्या इन्स्टाग्रामवरून त्याबाबत पोस्ट करून मदतीचे आवाहन केले होते.