महापालिकेने मे महिन्यात खड्डय़ांमध्ये भरलेली डांबरमिश्रीत खडी पहिल्याच पावसात वाहून गेल्याने रस्ते खडबडीत झाले असून अनेक भागातील वाहतूक चांगलीच रखडली. कंत्राटदारांची मुदत संपुष्टात आल्यामुळे नव्या कंत्राटदारांची नियुक्ती वेळेवर करणे गरजेचे होते. प्रशासनाने दिरंगाई केल्यामुळे कंत्राटदारांची नियुक्ती वेळेवर होऊ शकली नाही. प्रशासनाने पावसाळ्यात खड्डे बुजविण्याच्या कामांचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे सादर केला. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर शनिवारी काही कंत्राटदारांच्या हाती कार्यादेश पडले.
पालिका कर्मचाऱ्यांनी मे महिन्यात काही ठिकाणचे खड्डे ‘कोल्ड मिक्स’चा वापर करुन बुजविले. परंतु हे खड्डे काळजीपूर्वक भरण्यात आले नाहीत. त्यामुळे पावसाने हजेरी लावताच जागोजागचे खड्डे पुन्हा उखडले गेले आणि पाण्याची डबकी तयार झाली. परिणामी अनेक ठिकाणी वाहतुकीचाही बोजवारा उडाला. पहिल्याच पावसात पूर्व व पश्चिम द्रूतगती महामार्गही काही ठिकाणी खड्डेमय झाल्याने त्याचा फटका वाहतुकीला बसला आहे.