ढगाळ वातावरणाने तापमानवाढ होऊन दोन दिवस घामेजलेले मुंबईकर रविवारी मात्र दिवसभर सुटलेल्या गार वाऱ्यांनी गारठले. शहरात काही ठिकाणी पावसाच्या सरी पडल्याने तापमान चार अंश सेल्सिअसनी घसरले. रविवारी किमान तापमानाची १६.८ अंश सेल्सिअस नोंद झाली. ढगाळ वातावरण व पावसाचा प्रभाव सोमवापर्यंत राहणार आहे. त्यानंतर मात्र मुंबईसह राज्यातील हवामान कोरडे व निरभ्र होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
थंडीचे कारण
पश्चिमेकडून येणारे शीत वारे व पूर्वेकडून बाष्प घेऊन येणारे वारे एकत्रित आल्याने थंडीमध्ये पावसाची सरमिसळ झाली. राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस व गारांचा फटका शेतकऱ्यांना बसला. मुंबईतही ढगाळ वातावरणासह पावसाच्या काही सरी आल्या. ढगाळ वातावरणामुळे रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली होती. मात्र पावसामुळे हे तापमान झर्रकन खाली आले.
आणखी घसरण?
सांताक्रूझ येथे रविवारी सकाळी १६.८ अंश से. किमान तापमानाची नोंद झाली. यापूर्वी ७ डिसेंबरच्या १६.५ अंश से. तापमानाची नोंद झाल्याने या मोसमातील हे दुसऱ्या क्रमांकाचे किमान तापमान आहे. या तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट
राज्याच्या इतर भागांत गारा पडल्या असल्या तरी किमान तापमानात मात्र तीन ते पाच अंश से.नी वाढ झाली आहे. उत्तर भारतात मात्र थंडीची लाट आली आहे. राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, चंडिगड तसेच गुजरातमध्ये थंडीची लाट असून वाऱ्यांची दिशा उत्तरेकडून राहिल्यास राज्याच्या अंतर्गत भागात थंडीचा प्रभाव वाढू शकतो, असे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कमाल तापमानही घटले
जमिनीवरून येत असलेल्या कोरडय़ा वाऱ्यांमुळे रात्रीचे तापमान घसरत असले तरी दुपारी हवा तापत असल्याचा अनुभव सर्वानाच आला. हिवाळ्यात रात्री व दिवसाच्या तापमानात सुमारे १५ अंश से.पर्यंत फरक पडतो. मात्र गेल्या दोन दिवसांत हवेतील वाढलेले बाष्पाचे प्रमाण व पाऊस यामुळे दुपारचे तापमानही ३० अंश से.च्या आत आले. शनिवारी कुलाबा येथे २९.८ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ येथे ३१.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. रविवारी कमाल तापमान आणखी कमी झाले. कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही ठिकाणी पारा ३० अंश सेल्सिअसची पातळी गाठू शकला नाही. दोन्ही ठिकाणी अनुक्रमे २८ व २९.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा