आयपीएस अधिकाऱ्यांच्या दक्षता अधिकारी म्हणून नियुक्त्या
राज्यातील बाजार समित्यांच्या कारभारात सुसूत्रता आणण्याबरोबरच तेथील भ्रष्टाचार, संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा उच्छाद मोडून काढण्यासाठी लवकरच सर्व बाजार समित्यांवर भारतीय पोलीस सेवेतील(आयपीएस) वरिष्ठ अधिकाऱ्यांची दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती पणन विभागातील सूत्रांनी दिली.
राज्यात सध्या मुंबइ कृषी उत्पन्न बाजार समितीसह ३४ जिल्ह्यांत ३०७ लहान-मोठय़ा बाजार समित्या आहेत. या बाजार समित्यांमध्ये दररोज खरेदी- विक्रीचे कोटय़वधी रुपयांचे व्यवहार होतात. एकटय़ा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वर्षांला १५ हजार कोटींचे व्यवहार होतात. साहजिकच या बाजार समित्यांमध्ये अनेक अपप्रवृत्ती, गुंड प्रवृत्तींचा राबता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून शेतकऱ्यांना धमकावणे, व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळण्याचे प्रकारही घडतात. त्याचप्रमाणे काही ठिकाणी बाजार समितीमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना हाताशी धरून भ्रष्टाचारही केला जात असल्याच्या घटना घडत असतात. मात्र, राज्यात केवळ मुंबई आणि पुणे वगळता कोणत्याही बाजार समितीसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन नाही. शिवाय बाजार समितीमधील सुरक्षा रक्षकही प्रभावी कामगिरी करताना दिसत नाहीत. त्यामुळे संघटित गुन्हेदारी टोळ्यांकडून शेतकरी आणि व्यापाऱ्यांची अडवणूक होते. या सर्व बाबींचा विचार करून सिडकोच्या धर्तीवर आता बाजार समित्यांमध्येही दक्षता अधिकारी नियुक्त करण्याच्या हालचाली सरकार दरबारी सुरू झाल्या आहेत. बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची होणारी फसवणूक किंवा त्याला दिल्या जाणाऱ्या धमक्या तसेच या समित्यांमध्ये चालणाऱ्या अनागोंदी कारभाराला लगाम घालण्यासाठी हे दक्षता अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत.
- सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून लोहमार्ग पोलिसांच्या धर्तीवर बाजार समित्यांसाठीही स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याची विनंती केली आहे.
- गृह विभागाने सर्व बाजार समित्यांकडून अभिप्राय मागविल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे अभिप्राय येताच सर्व बाजार समित्यांमध्ये भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक दर्जाचा दक्षता अधिकारी नियुक्त करण्यात येणार असून हा अधिकारी बाजार समितीच्या सुरक्षेबरोबरच तेथील भ्रष्टाचारी कारभारावरही अंकुश ठेवण्याचे काम करीत असेही सूत्रांनी सांगितले.