मुंबई : गुजरातमध्ये मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची कामे वेगात सुरू असून पुलाची बांधकामे झपाट्याने सुरू आहेत. गुजरातमधील पाचव्या प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट पुलाचे नुकताच बांधकाम पूर्ण झाले.जपानमधील बुलेट ट्रेनच्या धर्तीवर देशात पहिला मुंबई – अहमदाबाद दरम्यान ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. महाराष्ट्र, गुजरात, दादरा आणि नगर हवेलीमध्ये बुलेट ट्रेनची कामे सुरू आहेत. सुरत जिल्ह्यातील कोसांबा जवळ राष्ट्रीय द्रुतगती मार्ग ४ वरील २६० मीटर लांबीचा प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट पुलाचे काम नुकताच पूर्ण झाले. हा पूल सुरत आणि भरुच बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान आहे.
राष्ट्रीय द्रुतगती मार्ग ४ हा दिल्ली – मुंबईला जोडणारा द्रुतगती मार्ग आहे. या पुलाच्या बांधकामाचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आले. आधुनिक पद्धतीने या पुलाची उभारणी करण्यात आली. त्यामुळे वाहनचालक आणि कामगार दोघांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यात आली. तसेच, वाहतूक अखंडित सुरू राहील आणि वाहनधारकांना कमीत कमी गैरसोय होईल याचीही विशेष काळजी घेण्यात आली, असे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पहिला पूल
गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ४८ ओलांडण्यासाठी २६० मीटर लांबीचा प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट पुलाचे बांधकाम १८ ऑगस्ट २०२४ रोजी पूर्ण झाले. सूरत आणि बिलीमोरा बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान हा पूल आहे.
दुसरा पूल
गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ४८ ओलांडण्यासाठी २१० मीटर लांबीच्या प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट पुलाचे बांधकाम १ ऑक्टोबर २०२४ रोजी पूर्ण झाले. सूरत आणि बिलीमोरा बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान हा पूल आहे.
तिसरा पूल
गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील पंचलाईजवळील वाघलधारा गावात राष्ट्रीय महामार्ग ४८ (दिल्ली-चेन्नई) ओलांडण्यासाठी २१० मीटर लांबीच्या प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट पुलाचे बांधकाम २ जानेवारी २०२५ रोजी पूर्ण झाले. वाघलधाराजवळ नव्याने बांधलेला पूल वापी आणि बिलीमोरा बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान आहे.
चौथा पूल
गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नडियादजवळील दाभान गावात राष्ट्रीय महामार्ग ४८ (दिल्ली – चेन्नई) ओलांडण्यासाठी २१० मीटर लांबीच्या प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट पुलाचे बांधकाम ९ जानेवारी २०२५ रोजी पूर्ण झाले. हा पूल आनंद आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान आहे.
मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन ५०८ किमी लांबीचा प्रकल्प असून या प्रकल्पाची ११ टप्प्यांत विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये ४६५ किमी लांबीचे व्हायाडक्ट (लांबलचक पूल), १२ स्थानके, १० किमी लांबीचे २८ स्टील पूल, २४ नदी पूल, ९७ किमी लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. राज्यात शीळफाटा – गुजरात सीमेवरील झरोली गावापर्यंत १३५ किमीं लांबीचे काम करण्यात येत आहे. राज्यात ठाणे, विरार, बोईसर या तीन स्थानकांच्या पायाभरणीचे काम सुरू आहे. पायाभरणी सुरू होणारे बोईसर पहिले स्थानक आहे.