मुंबई : मोसमी पाऊस परतून वाऱ्यांचा वेग कमी होताच मुंबईतील हवेचा दर्जा आता खालावू लागला आहे. सफर या संस्थेच्या नोंदींनुसार शहरातील हवेचा दर्जा काही दिवसांपासून वाईट श्रेणीत नोंदला जात आहे. वातावरणातील घातक पीएम २.५ आणि पीएम १० धूलीकणांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. विलेपार्ले येथे सोमवारी सायंकाळी अतिधोकादायक हवेची नोंद झाली असून हवा गुणवत्ता निर्देशांक ३१८ नोंदवला गेला. या हवेत घराबाहेर पडणेही धोकादायक ठरू शकते. या शिवाय माझगाव, कुलाबा, अंधेरी, मालाड, परळ, मुलुंड या परिसरातील हवा अतिवाईट असल्याची नोंद सोमवारी झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> भांडुपमध्ये तरूणाकडून प्रेयसीवर चालत्या रिक्षात चाकूने वार

मुंबई शहरात धुलीकणांच्या प्रमाणाने अतिधोकादायक पातळी ओलांडली आहे. त्यामुळे सध्या शहरातील हवा धोकादायक असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे परिणाम दिसून येत आहेत. सतत वाढत असलेल्या प्रदुषणामुळे मुंबईतील हवेचा दर्जा खालावत जात आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार हवेतील पीएम २.५ आणि पीएम १० या धुलीकणांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. सोमवारी सायंकाळी विलेपार्ले येथील हवा गुणवत्ता निर्देशांक ३१८ होता, माझगाव २८४, चकाला २७७, कुलाबा २१२, माझगाव २१४, वरळी २०५, चेंबूर २०१, मालाड २०९, मुलुंड येथील २१७ होता.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार हवा गुणवत्ता निर्देशांकामधील ०-५० म्हणजे चांगले, ५१-१०० मधील समाधानकारक, १०१-२०० दरम्यान मध्यम, २०१-३०० वाईट, ३०१-४०० दरम्यान अत्यंत वाईट आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे अतिधोकादायक समजली जाते. माझगाव येथे पीएम २.५ कणांची मात्रा अधिक आहे. पीएम २.५ हे अधिक घातक असून ते श्वसनप्रक्रीयेद्वारे शरिरात जातात त्याचे हवेतील सामान्य प्रमाण हे ३५ मायक्रो क्यूबीक पेक्षा जास्त नसावेत आणि हे कण पीएम १० च्या तुलनेत सूक्ष्म असल्याने सहज शरीरात प्रवेश करतात.

हेही वाचा >>>मिरा-भाईंदरमधील ४७ रस्ते होणार चकाचक; रस्त्यांच्या सुधारीकरण आणि काँक्रीटीकरणाचा एमएमआरडीएचा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून हवेचा दर्जा अत्यंत वाईट आहे. दोन्ही बाजूंनी वारे वाहत असल्याने प्रदूषण मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही ठिकाणी समान पोहोचते. विकासकामे आदींमुळे हवेत धूळ उडण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. वारंवार तक्रार करूनही त्याचा उपयोग होत नाही – बी.एन.कुमार, संचालक, नॅटकनेक्ट फाउंडेशन

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai air quality index pollution gets severe in mumbai bad air quality mumbai print news zws