मुंबई : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारीही मुंबईतील हवेचा दर्जा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदला गेला. मुंबईतील काही भागात गुरुवारी ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली, तर इतर भागात ‘वाईट’ ते ‘मध्यम’ श्रेणीत हवेची नोंद झाली होती. ही परिस्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. कमी आवाजाच्या मात्र अधिक आतषबाजी करणाऱ्या फटाक्यांमुळे शहरातील हवा गुरुवारपासून खालावली आहे. मुंबईतील विमानतळ परिसर वगळता शुक्रवारी सर्व भागात धूलिकणांची संख्या प्रचंड वाढली होती.
हेही वाचा >>> फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून ॲन्टॉप हिल येथे तरूणाची हत्या
भायखळा , देवनार, कांदिवली, वांद्रे, मालाड आणि शिवडी भागात शुक्रवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास ‘वाईट’ हवा नोंदली गेली होती. येथील हवा निर्देशांक अनुक्रमे २०५, २०८, २६६, २०२, २५३, २८५ इतका होता. या सर्व भागांतील हवेची गुणवत्ता गुरुवारपासून खालावली आहे. हवा निर्देशांक १०० पेक्षा अधिक असू नये, असे तज्ज्ञ म्हणणे आहे. नेमक्या दिवाळीतील दोन दिवसांत या नोंदीने शंभरी पार केली आहे. प्रदूषणाची ही मात्रा दमा आणि हृदयरोगाच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकते. मुंबईच्या अनेक भागातील हवेची गुणवत्ता शुक्रवारी संध्याकाळी ‘वाईट’ स्वरूपाची होती. हवेचा दर्जा सकाळी ‘मध्यम’ स्वरूपाचा होता. मात्र दुपारनंतर हवेची गुणवत्ता ढासळत गेली. दरम्यान, फटाक्यांच्या रोषणाईबरोबरच परिसरात धुराचे लोटही पसरले होते. आवाजाच्या फटाक्यांच्या बरोबरीने नागरिकांनी फॅन्सी, रोषणाईचे फटाके वाजविल्याने हवेची गुणवत्ता खालावली आहे. विशेष करून बालके, गर्भवती, वृध्द आणि श्वसनविकार असलेल्या नागरिकांना त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे.