मुंबई : नेहमीच वर्दळीच्या असणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर म्हणजेच ‘टर्मिनल २’च्या वाहनतळावर ‘मर्सिडीज बेंज’ या आलिशान कारचा रविवारी सकाळी विचित्र अपघात झाला. मर्सिडीज कारच्या धडकेत दोन परदेशी नागरिकांसह पाच जण जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांकडून चालकाला अटक करण्यात आली असून गाडी ताब्यात घेऊन अधिक तपास सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, पाच जखमींमध्ये दोन परदेशी नागरिकांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर विमानतळावरील तीन जखमी कर्मचाऱ्यांवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच या अपघातादरम्यान चालक दारू किंवा अंमली पदार्थांच्या नशेत नव्हता, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र कार चालकाने ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबल्याने अपघात झाल्याचे समजत आहे.

नेमका अपघात कसा झाला?

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ‘टर्मिनल २’च्या परिसरात ‘मर्सिडीज बेंज’ या आलिशान कारचा अपघात झाला. यावेळी आरोपी कारचालकाने एकाला प्रवेशद्वार क्रमांक १ वर सोडले होते. त्यानंतर सदर व्यक्तीला सोडून परत जाताना त्याचा मर्सिडीज कारवरचा ताबा सुटला आणि ती कार प्रवेशद्वार क्रमांक ३ च्या समोरील उतारावर जाऊन आदळली. या अपघातामध्ये दोन परदेशी नागरिकांसह पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही परदेशी प्रवासी हे झेक रिपब्लिकचे नागरिक असल्याची माहिती समोर येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘टर्मिनल २’च्या डिपार्चर मार्गिकेत रविवारी सकाळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि या अपघातात पाच जण जखमी झाले. यानंतर विमानतळ वैद्यकीय पथकाने तातडीने प्राथमिक उपचार करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिस आणि इतर यंत्रणेच्या माध्यमातून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai airport accident five injured including two foreigners in mercedes benz car accident mumbai print news css