मुंबई : देशातील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे विमानतळ असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामकाज गुरुवारी तांत्रिक अडचणींमुळे तब्बल दोन ते अडीच तास ठप्प झाले. त्यामुळे विमानतळावर प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी झाली. इंटरनेट सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांची नोंदणी, तपासणी, चेक-इन, बोर्डिग पास देणे आदी सर्व कामे हाताने करावी लागल्यामुळे अनेक विमानांच्या उड्डाणांना विलंब झाला.
देशातील महत्त्वाच्या विमानतळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची गणती होते. या विमानतळाच्या टर्मिनल-२चा सव्र्हर बंद पडल्यामुळे गुरुवारी सायंकाळी विमानतळावरील यंत्रणा ठप्प झाल्या. विमानतळाबाहेर सुरू असलेल्या विकासकामांदरम्यान ऑप्टिकल फायबर केबल कापली गेल्यामुळे इंटरनेट सेवेवर परिणाम झाला. साधारण साडेचार-पाच वाजण्याच्या सुमारास ठप्प झालेली यंत्रणा सात वाजण्याच्या सुमारास सुरू झाली. त्यामुळे विमानतळावर प्रवाशांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली. त्यामुळे विमानतळावर लेखी कामकाज सुरू करण्यात आले. मात्र, त्यासाठी वेळ लागत असल्यामुळे प्रत्येक खिडकीवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा होत्या. या गोंधळामुळे अनेक उड्डाणेही रखडली. साधारण अडीच तासांनी हळूहळू सेवा पूर्ववत झाली असली तरी मुळात खूप गर्दी झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत खोळंबलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला नाही.
सातत्याने अडचणी?
विमानतळावरील गर्दी, सेवेतील त्रुटींबाबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रवासी सातत्याने तक्रारी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विमानतळावर सातत्याने गर्दी होत असून यंत्रणाचे कामकाज संथगतीने सुरू आहे. सुरक्षा तपासणीलाही खूप वेळ लागतो. मुंबईत आलेल्या प्रवाशांना सामान मिळण्यासाठी खूपवेळ थांबावे लागते, अशा तक्रारी प्रवासी सातत्याने करत आहेत.
प्रवाशांना मनस्ताप
सेवा विस्कळीत झाली तरी विमानतळावर प्रवाशांना नेमके काय झाले आहे, याची माहिती देण्यात येत नव्हती. गर्दीमुळे अनेकांना बसण्यासाठीही जागा शिल्लक राहिली नाही. ज्येष्ठ नागरिकांची कुचंबणा झाली. मोठय़ा प्रमाणात गर्दी झाल्यामुळे विमानतळावरील इतर सोयी-सुविधांवरही परिणाम झाला.