मुंबई : सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर सोमवारी केलेल्या कारवाईत साडेपाच किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाला अटक करण्यात आल्याची माहिती सीमाशुल्क विभागाकडून देण्यात आली. आरोपीविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – बहुस्तरीय चाचणी पद्धतीने नीट युजी परीक्षा घेण्याचा समितीचा अहवाल
सीमाशुल्क विभागाने सोमवारी मध्यरात्री ही कारवाई केली. एक संशयीत प्रवासी बँकॉकहून अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे एका प्रवशाला ताब्यात घेऊन तपासणी करण्यात आली. त्यावेळी खाद्यपदार्थांच्या पाकिटामध्ये एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये उच्च प्रतीचा गांजा सापडला. आरोपीकडून पाच किलो ५६५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत पाच कोटी ५६ लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.