मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील सहा तास बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सकाळी ११ वाजल्यापासून बंद ठेवण्यात आले असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद असणार आहे. यामुळे जवळपास ५०० विमानसेवांना फटका बसणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ येथे पावसाळ्यानंतरच्या नियोजित देखभाल दुरुस्तीसाठी RWY 09/27 आणि RWY 14/32 या दोन धावपट्टी आज सहा तासांसाठी बंद राहणार आहेत. यासंदर्भातील माहिती सहा महिन्यांआधीच पूर्वसूचना म्हणजेच नोटीस टू एअरमन जाहीर करण्यात आली होती, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबई विमानतळावरून दिवसाला ९०० विमान उड्डाणे होत असतात. त्यापैकी ५०० विमानसेवा खंडित होणार आहेत. दोन्ही धावपट्ट्यांपैकी मुख्य धावपट्टीवरून तासाला ४५ तर, दुसऱ्या धावपट्टीवरून तासाला ३५ उड्डाणे होत असतात.
मुंबई विमानतळ देशातील सर्व व्यग्र विमानतळ असून त्यानंतर दिल्ली विमानतळाचा क्रमांक लागतो. मुंबई विमानतळावर सध्या दररोज ९०० ते ९५० विमान फेऱ्या होतात. ब्लॉकमुळे यातील काही सेवा रद्द होतील. मुंबई विमानतळावर देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय विमानांची वर्दळ वाढली असून प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे.