नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली असल्याने गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक मुंबईकर उत्सव साजरा करण्यासाठी आपल्या मुळ गावी निघाले आहेत. त्यामुळे आज सकाळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. गर्दी एवढी जास्त होती की विमानतळाचे टर्मिनल एखाद्या गजबजलेल्या रेल्वे स्टेशनसारखे दिसत होते. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल) च्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “आम्हाला या गर्दीचा अंदाज होता आणि त्यामुळे काही विमान कंपन्यांना सांताक्रूझ टर्मिनलवर हलवले होते.” दरम्यान, या गर्दीमुळे काही प्रवाशांना त्यांच्या विमानापर्यंत पोहोचता न आल्याचाही प्रकार घडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या गर्दीमुळे विमानापर्यंत न पोहोचू शकलेल्या प्रवाशांनी ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे. यामध्ये गायक विशाल डडलानीचाही समावेश आहे. विशालने ट्विट केलंय की, “मुंबई विमानतळ खरंच भंगार आहे. अक्षरशः आपण अंधारयुगात आहोत, असं वाटतंय. न संपणारी गर्दी, तुटलेल्या मशीन्स आणि सर्वत्र गोंधळ. विमानतळावरील कर्मचारी प्रयत्न करत आहेत, परंतु ही गर्दी सांभाळण्यात ते अयशस्वी ठरले आहेत. हा भोंगळ कारभार कोण चालवतंय? त्यांना टॅग करा,” असं त्याने म्हटलंय.

तसेच 5पैसा कॅपिटल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश गगदानी यांनी देखील ट्विट केले आहे. “मुंबई विमानतळावर खूप गोंधळ आहे आणि चेक इन करण्यासाठी किमान एक तास लागतोय. त्या नंतर सिक्युरिटी चेकिंगसाठी ही गर्दी. अडीच तास आधी विमानतळावर पोहोचल्यानंतरही एखादी व्यक्ती फ्लाईट कशी पकडू शकते? ”, असा सवाल त्यांनी केला आहे.

विमानतळ प्रशासनाचं स्पष्टीकरण..

“सणांमुळे प्रवासी वाहतुकीत वाढ झाली आहे. मुंबई विमानतळाप्रमाणेच देशातील इतर विमानतळांवरही असेच अनुभव आले आहेत. अलीकडेच गुप्तचर संस्थांकडून प्राप्त झालेल्या अहवालांमुळे आणि राज्यातील दुसऱ्या विमानतळावरील धमकीमुळे विमानतळावरील सुरक्षा उपायांमध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे. प्रवाशांची सुरक्षितता आमच्यासाठी महत्वाची आहे. तसेच विमानतळावरील प्रक्रिया लवकर पूर्ण व्हाव्यात, यासाठी आम्ही अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत. शिवाय करोना संदर्भात सरकारने जारी केलेल्या नियमांचं पालन करण्यात येत असून आज प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो,” असं निवेदन विमानतळ प्रशासनाने जारी केलं आहे.