मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ वरून पुढे वांद्रयाच्या दिशेने जाणे सोपे व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) टर्मिनल १ जवळ एक उड्डाणपूल बांधला आहे. हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होऊन चार महिने उलटले नाहीत तोच पुलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केला जात आहेत. या प्रकरणाची एमएमआरडीएने गंभीर दखल घेत संबंधित कंत्राटदार आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर कंत्राटदाराला दंड ही ठोठावला असून कंत्राटदाराने तातडीने खड्डे दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांची संख्या बरीच मोठी आहे. टर्मिनल २ वरून वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीत अडकावे लागते. तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी होते. याचा फटका वांद्रे आणि अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना बसतो. ही बाब लक्षात घेता टर्मिनल २ वरून वांद्र्याला जाणे सोपे व्हावे यासाठी एमएमआरडीएने टर्मिनल १ जवळ, पश्चिम द्रुतगती महामार्गावर ७९० मीटर लांबीचा आणि ८ मीटर रुंदीचा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ४८.४३ कोटी रुपये खर्च करून मे. आर. पी. एस. इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लिमिटेड या कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. मार्चमध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या पुलामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ ते वांद्रे प्रवास आता वेगवान झाला आहे. तर पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी काही अंशी कमी होण्यास मदत होत आहे. मात्र चार महिन्यातच या पुलावर खड्डे पडले असून पुलाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
हेही वाचा : Mumbai Local : भर पावसात मध्य रेल्वेचा खोळंबा, माटुंगा रेल्वे स्थानकात ओव्हररेड वायरवर बांबू कोसळले
पुलावर खड्डे पडल्याचे निदर्शनास येताच महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जी यांनी त्याची गंभीर दखल घेतली असून कंत्राटदार आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच कंत्राटदाराला दंड ही ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, कंत्राटदारास तातडीने खड्डे बुजविण्याचे निर्देश मुखर्जी यांनी दिले होते. त्यानुसार खड्डे दुरुस्ती नुकतीच पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.
© The Indian Express (P) Ltd