दोन्ही मुले उच्चशिक्षित मग आता कशाला काम करता, आता तुम्ही काम थांबवा असे आम्ही अॅलेक्स कुरिया यांना नेहमी सांगायचो. पण त्यांनी आमचे म्हणणे ऐकले नाही. संपूर्ण आयुष्य मेहनत करणाऱ्या माझ्या भावाचा शेवटही चेंगराचेंगरीत व्हावा हे दुर्दैवीच आहे, पाणावलेल्या डोळ्यांनी अॅलेक्स यांचे नातेवाईक सांगत होते.
वसईत राहणारे अॅलेक्स कुरिया (वय ५८) यांचा दादरमध्ये फुले विकण्याचा व्यवसाय आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत अॅलेक्स कुरिया पुढे आले. आता त्यांचा एक मुलगा सीए असून, दुसरा मुलगाही उच्चशिक्षित आहे. दोन्ही मुले कमावती असल्याने आता अॅलेक्स कुरिया यांनी व्यवसाय थांबवून घरी आराम करावा, असे कुटुंबियांनी त्यांना सांगितले होते. पण व्यवसायाची इच्छा त्यांना शांत बसू देत नव्हती.
शुक्रवारी सकाळी अॅलेक्स फुले विकून घरी परतण्यासाठी निघाले. फुल मार्केटवरुन एल्फिन्स्टनला जाण्यासाठी शॉर्टकट असून, अॅलेक्स कुरिया याच मार्गाने एल्फिन्स्टनला आले. मात्र नियतीने त्यांचा घात केला आणि चेंगराचेंगरीत अॅलेक्स कुरिया यांना जीव गमवावा लागला. अॅलेक्स यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. ‘माझ्या भावाने हलाखीत आयुष्य काढले. अथक मेहनत करुन त्याने पैसे कमवले आणि मुलांना चांगले शिक्षण दिले. पण त्याचा मृत्यूही चेंगराचेंगरीसारख्या घटनेत व्हावा हे दुर्दैवच आहे’ अशी प्रतिक्रिया त्यांच्या नातेवाईकांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिली.
का झाली चेंगराचेंगरी?
एल्फिन्स्टन-परळ रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर सकाळच्या वेळेत प्रवाशांची मोठी गर्दी असते. हा पुल खूपच अरुंद असून शुक्रवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू होता. लोकलमधून उतरलेले प्रवासी पावसामुळे पुलावरच थांबली. याचदरम्यान गर्दी वाढली आणि यामुळे चेंगराचेंगरी झाली असा प्राथमिक अंदाज आहे.
मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@loksatta.com