पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुंबईतील सभेत रेल्वे प्रवासातील सुधारणांचा वारंवार उल्लेख केल्यामुळे यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाकडून मुंबईकर प्रवासी खूपच अपेक्षा बाळगून आहेत. त्यातच मुंबईतील विविध प्रकल्प पुरेशा निधीअभावी अपूर्णावस्थेत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. मुंबई-ठाणे परिसरातील सर्वच्या सर्व खासदार हे सत्ताधारी भाजप-शिवसेना याच पक्षांचे आहेत. त्यामुळे हे सर्व खासदार एकजुटीने मुंबईकरांच्या प्रश्नांची तड लावतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य प्रवाशांना आहे. मात्र या खासदारांपैकी किरीट सोमय्या वगळता सर्वच खासदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांनाही रेल्वे अर्थसंकल्पाकडून खास मुंबईसाठी अशा काही अपेक्षा आहेतच. मुंबईचे खासदार आणि त्यांच्या रेल्वे अर्थसंकल्पाकडून असलेल्या तीन महत्त्वाच्या अपेक्षा..
* खासदार अरविंद सावंत (दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ)
१. रेल्वेगाडय़ांमधील सुविधा आणि फलाटांची उंची वाढवण्यासाठी ठोस तरतूद हवी.
२. महिलांसाठी प्रसाधनगृहे, विश्रांती कक्ष, वैद्यकीय व पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी निधी.
३. महत्त्वाच्या सर्व स्थानकांवर रुग्णवाहिका हवी.
* खासदार गजानन कीर्तीकर (उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ)
१. मुंबईकरांच्या पासात आणि तिकिटात केलेली भाडेवाढ मागे घ्यावी.
२. पश्चिम आणि मध्य रेल्वेमार्गावरील पाचव्या व सहाव्या मार्गिकेसाठी निधी मिळावा.
३. सर्व पादचारी पुलांचे लेखा परीक्षण करून त्यांची क्षमता वाढवण्यासाठी निधी द्यावा.
* खासदार गोपाळ शेट्टी (उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ)
१. उपनगरीय रेल्वेमार्गावरील अपघातांची संख्या टाळण्यासाठी ठोस उपाय योजावेत.
२. उपनगरीय लोकल गाडय़ांच्या डब्यांची संख्या वाढवावी आणि डबलडेकर गाडी सुरू करावी.
३. उन्नत रेल्वेमार्गाच्या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी तरतूद हवी.
* खासदार किरीट सोमय्या (ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ)
१. मुंबईतील फलाटांची उंची वाढवण्यासाठी योग्य निधीची तरतूद हवी.
२. १५ डब्यांच्या गाडय़ांची संख्या वाढवण्यासाठी नवीन डबे व गाडय़ा मुंबईसाठी देण्यात याव्यात.
३. कोकणात जाणाऱ्या गाडय़ांची संख्या वाढवावी. तसेच कोकणी जनतेची संख्या लक्षणीय असलेल्या स्थानकांवर या गाडय़ांना थांबा द्यावा.
* खासदार राहुल शेवाळे (दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ)
१. परळ टर्मिनसचा प्रस्ताव गेले वर्षभर रेल्वे बोर्डाकडे पडून आहे. या टर्मिनसची घोषणा आणि निधीची तरतूद हवी.
२. प्रवाशांसाठी आणि विशेषत: महिला प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने उपाययोजना हवी.
३. हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणासाठी ठोस आराखडा आणि आर्थिक तरतूद हवी.
* खासदार पूनम महाजन (उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ)
१. पश्चिम तसेच मध्य उपनगरीय स्थानकांवरील पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल अपेक्षित आहे.
२. पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशिप या तत्त्वावर स्थानकांचा विकास करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत.
३. सुरक्षेसाठी महिलांच्या प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी आर्थिक निधीची तरतूद हवी.
* खासदार राजन विचारे (ठाणे लोकसभा मतदारसंघ)
१. ठाणे स्थानक आंततराष्ट्रीय करावे आणि त्याच्या विस्तारासाठी ठोस योजना हवी.
२. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे-पनवेल आणि ठाणे-वाशी या फेऱ्यांमध्ये वाढ झाली पाहिजे.
३. कल्याण-वाशी प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करून पूर्णत्वास न्यावे.
* खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (कल्याण लोकसभा मतदारसंघ)
१. उत्तर आणि दक्षिण भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण टर्मिनसचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम पूर्णत्वास न्यायला हवे.
२. फलाटांची उंची, अपंगांसाठीच्या सुविधा, स्वच्छतागृहे, सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय मदत या महत्त्वाच्या सुविधांसाठी निधी उपलब्ध व्हावा.
३. सर्व उपनगरीय गाडय़ा १५ डब्यांच्या करून त्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी. त्यामुळे उपनगरीय गर्दी कमी होईल.
* खासदार कपिल पाटील (भिवंडी लोकसभा मतदारसंघ)
१. कल्याण-नगर या रेल्वेमार्गाचे काम यंदाच्या वर्षांत प्रत्यक्षात सुरू होणे अपेक्षित आहे.
२. गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ठाणे-कल्याण, ठाणे-कर्जत शटल सेवांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.
३. कल्याण पल्याडच्या स्थानकांच्या सुरक्षेसाठी भरीव तरतुदीची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे रेल्वे फलाटांची उंची वाढवण्यासाठी निधी द्यावा.
* राम नाईक (माजी केंद्रीय रेल्वेमंत्री)
१. १२५ किलोमीटर क्षेत्र असलेल्या मुंबई उपनगरीय रेल्वेवर केलेली भाडेवाढ मागे घ्यावी.
२. उपनगरीय रेल्वेची श्वेतपत्रिका काढावी. त्यामुळे या सेवेमुळे रेल्वेला फायदा होत असल्याचे सिद्ध होईल.
३. फलाटांची उंची वाढवणे, नवीन पादचारी पूल आणि अधिक सरकते जिने बसवणे यासाठी भरघोस तरतूद अपेक्षित.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा