अन्नधान्य सुरक्षेबरोबरच आपण ऊर्जासुरक्षेचाही विचार केला पाहिजे. त्यासाठी देशांतर्गत कोळसा उत्पादन वाढवून आयात कोळशावरील अवलंबित्व कमी करण्याची गरज राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाचे (एनटीपीसी) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुप रॉय-चौधरी यांनी व्यक्त केली. तसेच सोलापुरात २०१७ मध्ये ‘एनटीपीसी’चा वीजप्रकल्प सुरू होईल, असेही त्यांनी नमूद केले. देशात कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. वीजनिर्मिती प्रकल्पांची उभारणी ज्या वेगाने झाली त्याप्रमाणात कोळसा खाणी सुरू झाल्या नाहीत त्यातून हा प्रश्न निर्माण झाला आहे. भारताकडे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे कोळशाचे साठे आहेत. त्यामुळे वीजनिर्मितीसाठी कोळसा उपलब्ध होण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न लवकरात लवकर झाले पाहिजेत, असे चौधरी यांनी नमूद केले. अपुऱ्या कोळशामुळे मागच्या वर्षी ‘एनटीपीसी’ने सुमारे ९ दशलक्ष टन कोळसा आयात केला होता. यंदा कोळसा टंचाई वाढल्याने हेच प्रमाण १२ दशलक्ष टनपर्यंत वाढवावे लागले.

मी पळपुटा नाही-विनोद तावडे
प्रतिनिधी, मुंबई</strong>
मी तुमच्यासारखा पळपुटा नाही, असे प्रत्युत्तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांना दिले आहे. विनोद तावडे हे राहतात एकीकडे आणि निवडणूक मात्र दुसरीकडून लढवत आहेत, अशी टिका राज ठाकरे यांनी केली होती. त्याला प्रत्युतर देताना तावडे यांनी वरील टोला लगावला. राज यानी निवडणूक लढविण्याचे जाहीर केले होते, पण त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला, मी मात्र तसे न करता निवणूक लढवत असल्याचे तावडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.

बंगल्याभोवतालच्या जागेसाठी गुलजारांची न्यायालयात धाव  
मुंबई : वांद्रे येथील आपल्या बंगल्याभोवतालच्या हक्काच्या जागेसाठी ज्येष्ठ गीतकार गुलजार यांना विकासक आणि हाऊसिंग सोसायटीशी झगडावे लागत आहे. त्यासाठी त्यांना उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गुलजार यांच्या दाव्यानुसार, सहा मजली इमारतीसाठी विकासक आणि सोसायटीने त्यांच्या बंगल्याभोवतालचा ४०० चौरस मीटर जागा फसवणुकीने बळकावली. त्यामुळे या फसवणुकीची पोलीस चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. विकसक वेस्टर्न इंडिया कॉर्पोरेशन आणि पाली हिल पंचशील को. ऑप. हौ. सोसायटी यांच्याशी सुरू असलेला वाद निकाली लागेल याची वर्षभर वाट पाहिल्यानंतर हताश झालेल्या गुलजार यांनी महानगरदंडाधिकाऱ्यांसह उच्च न्यायालयात अंतरिम दिलासा मिळण्यासाठी धाव घेतली आहे.

दीपक निकाळजे अपघातातून बचावले
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा भाऊ आणि चेंबूर मतदारसंघातील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार दीपक निकाळजे सोमवारी रात्री अपघातातून  बचावले. प्रचार संपवून आपल्या गाडीत बसत असताना डम्परने त्यांच्या गाडीला मागून धडक दिली. राजकीय पाश्र्वभूमी पाहता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी निकाळजे यांनी केली आहे. कार्यकर्त्यांनी डम्पर चालक अरुण गजभिये याला पकडून चेंबूर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांनी डम्पर चालकाला अटक करून नंतर जामिनावर मुक्तता केली. पोलिसांनी घातपाताची शक्यात फेटाळून लावली आहे. वाहतुकीच्या ओघात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

दगडाने ठेचून  मजुराची हत्या
ठाणे : ज्ञानेश्वरनगर भागात सोमवारी मध्यरात्री एका ५० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला असून त्याची दगडाने डोके ठेचून हत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृत व्यक्ती मजूर वर्गातील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मृत व्यक्तीच्या खिशात ५० रुपयांव्यतिरिक्त कोणतीही कागदपत्रे सापडली नाहीत. त्यामुळे या व्यक्तीची अद्याप ओळख पटू शकलेली नाही, तसेच या हत्येमागचे कारण अजूनही समजू शकलेले नाही.

कळवा स्थानकात चोरीचा प्रयत्न
ठाणे : कळवा स्थानकातील तिकीट कार्यालयात मंगळवारी पहाटे अज्ञात चोरटय़ांनी चोरीचा प्रयत्न केला. या तिकीट कार्यालयात कोणत्याही प्रकारची रोख रक्कम, तिकीट कुपन्स नसल्याने चोरटय़ांना रिकाम्या हाताने परतावे लागले. मात्र या प्रकाराने रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  सीसीटीव्ही व श्वानपथकाच्या साहाय्याने आरोपीचा शोध सुरू केला आहे.

रेती उत्खननप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा
शहापूर : मुंबई-नाशिक महामार्गावरील खर्डी उड्डाण पूल व रेल्वे मार्गालगत अवैधरीत्या मातीचे उत्खनन केल्याबद्दल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी दिले आहेत. त्यामुळे बेकायदेशीररीत्या माती उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामात महसूल यंत्रणा व्यस्त असल्याने त्याचा फायदा घेत हा उद्योग सुरू आहे.