Andheri Lokhandwala Mumbai Fire News Update : अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला संकुलातील एका इमारतीत लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन वृद्धांचा समावेश आहे. दहाव्या मजल्यावरील एका सदनिकेत ही आग लागली होती. आग कशामुळे लागली याबाबत अद्याप तपास सुरू आहे. या आगीबाबत संशय व्यक्त होत असून या प्रकरणी पोलिसही तपास करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोखंडवाला संकुलतील ‘रिया पॅलेस’ या १४ मजली इमारतीमधील दहाव्या मजल्यावरील एका सदनिकेत सकाळी ७.३० च्या सुमारास आग लागली होती. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य हाती घेतले. सकाळी ९ च्या सुमारास आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आग लागलेल्या सदनिकेतील तिघे होरपळले होते. त्यांना कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. चंद्रप्रकाश सोनी (७४), कांता सोनी (७४) आणि पेलूबेटा (४५) अशी मृतांची नावे आहेत.

हेही वाचा >> माजी भाजपा खासदाराच्या पुतण्याची मुंबईत आत्महत्या, इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून घेतली उडी

दुर्घटनाग्रस्त सदनिकेमध्ये एक वृद्ध जोडपे वास्तव्यास होते. त्यांच्यासोबत एक नोकरही राहात होता. या जोडप्याचा एक मुलगा परदेशात वास्तव्यास आहे. सकाळी आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावला, मात्र दरवाजा उघडता येत नव्हता. अग्निशमन दलाने आग विझवल्यानंतर घरात प्रवेश केला असता वृद्ध जोडपे होरपळलेल्या अवस्थेत आढळले. तर दुसऱ्या खोलीत नोकर होता. गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, ही आग विझवताना काही संशयास्पद बाबी अग्निशमन दलाच्या जवानांच्या निदर्शनास आल्या असून त्याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात असल्याचे अग्निशमन दलातील सूत्रांनी सांगितले. ही आग विद्युत बिघाडामुळे लागल्याचे प्रथमदर्शनी दिसत नाही. तसेच घटनास्थळी टर्पेंटाईनचा डबाही आढळल्यामुळे या आगीबाबत संशय व्यक्त होत आहे. इमारतीतील रहिवाशांनीही या आगीबाबत संशय व्यक्त केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai andheri lokhandwala highrise bulding fire 3 people died sgk