RBI Imposes Restrictions on New India Co-operative Bank Mumbai : भारतीय रिझर्व्ह बँकेने काल रात्री मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर नवीन कर्ज वितरीत करण्यास आणि ठेवी काढण्यास सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे. बँकेत अलीकडील काळात घडलेल्या काही घडामोडींमुळे ठेवीदारांच्या ठेवींचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. यानंतर शुक्रवारी सकाळी मुंबईतील अंधेरीत बँकेच्या शाखेबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी जमल्याचे पाहायला मिळत आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर ग्राहकांनी त्यांच्या बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी ही गर्दी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान गुरुवारी रात्री, भारतीय रिझर्व्ह बँकेने मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. या निर्बंधानुसार, बँकेचे ग्राहकही त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत. पीटीआयच्या वृत्तानुसार, बँकेच्या सध्याची स्थिती लक्षात घेता, रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांनाही रक्कम काढण्यावर निर्बंध घातले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे आरबीआयच्या आदेशानुसार पुढील ६ महिन्यांसाठी बँकेवर हे निर्बंध लागू असणार आहेत.

दरम्यान आरबीआयने म्हटले आहे की, या निर्देशांचा अर्थ बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आला आहे असे नाही. ते त्यांच्या स्थितीवर लक्ष ठेवतील आणि आवश्यकतेनुसार कारवाई करतील.

‘आरबीआय’कडून कोणते निर्बंध?

काही विशिष्ट अटी लागू करत आरबीआयने ग्राहकांना ठेवींद्वारे कर्ज फेडण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय, ही बँक आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार, भाडे आणि वीज बिल यासारख्या काही आवश्यक कामांवर देखील खर्च करू शकणार. आरबीआयच्या सूचनांनुसार, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक १४ फेब्रुवारीपासून पूर्व-मंजुरीशिवाय कोणतेही कर्ज किंवा आगाऊ रक्कम देता येणार नाही. याशिवाय, आजपासून ही बँक कोणत्याही ग्राहकांची ठेव स्वीकारणार नाही किंवा त्यांच्या खात्यातून पैसे काढणार नाही. पण, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व पात्र ठेवीदारांना त्यांच्या ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर ठेव विमा आणि पत हमी महामंडळाकडून ठेव विमा दाव्याची रक्कम मिळवता येणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून बँक तोट्यात

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक गेल्या दोन आर्थिक वर्षांत तोट्यात आहे, मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला २२७.८ दशलक्ष रुपयांचा आणि २०२३ मध्ये ३०७.५ दशलक्ष रुपयांचा तोटा झाला आहे, असे बँकेचया वार्षिक अहवालात म्हटले आहे. याबाबत रॉयटर्स या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.