मुंबई : धारावी, वांद्रे रेक्लमेशनपाठोपाठ मुंबईतील आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प अदानी समूहाकडे गेला आहे. गोरेगाव पश्चिम येथील १४२ एकरांवरील मोतीलाल नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाची आर्थिक निविदा मंगळवारी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून खुली करण्यात आली. या निविदेत अदानी समूहाने बाजी मारली.
निविदेतील अटीनुसार ३ लाख ८३ हजार चौ. मीटर क्षेत्रापेक्षा अधिक ३ लाख ९७ हजार १०० चौ. मीटर क्षेत्र म्हाडाला बांधून देण्याची तयारी अदानी समूहाने दर्शवली आहे. आता लवकरच निविदा अंतिम करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. या (पान ६ वर) (पान १ वरून) पुनर्विकासाच्या माध्यमातून अदानी समूहाला विक्रीसाठी १८ लाख ८० हजार चौ. मीटर इतके क्षेत्र उपलब्ध होणार आहे. न्यायालयाच्या परवानगीनुसार मंगळवारी मुंबई मंडळाकडून आर्थिक निविदा खुल्या करण्यात आल्या.
निविदेतील अटीनुसार एकूण क्षेत्राच्या १३.२९ टक्के क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर अर्थात ३ लाख ८३ हजार चौ. मीटर क्षेत्रावर घरे बांधून देणाऱ्या कंपनीस कंत्राट बहाल केले जाणार होते. त्यानुसार अदानीने १३.७८ टक्के अर्थात ३ लाख ९७ हजार १०० चौ. मीटर जागेवर म्हाडास घरे बांधून देण्याची तयारी दर्शवली. त्याच वेळी एल अँड टीकडून मात्र केवळ ९ टक्के अर्थात २ लाख ६० हजार चौ.मीटर क्षेत्रानुसार निविदा सादर करण्यात आली, असे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितले. आता निविदा अंतिम करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवून पुनर्विकास मार्गी लावण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
आणखी एका प्रकल्पाची भर
धारावीचा पुनर्विकास अदानीकडून केला जात आहे. एमएसआरडीसीच्या अखत्यारीतील वांद्रे रेक्लेमेशन परिसराचा (एमएसआरडीसीच्या मुख्यालयासह) पुनर्विकासही अदानीकडे आहे. त्याच वेळी अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भूखंडावरील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत विक्री करावयाच्या इमारतीचे बांधकाम पटकावले आहे. आता त्यात आणखी एका मोठ्या मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाची भर पडली आहे.
मोतीलाल नगरमधील रहिवाशांना नियमानुसार २४०० चौ. फुटांचे घर मिळणे अपेक्षित असताना म्हाडाकडून केवळ १६०० चौ. फुटांचे घरे दिले जाणार आहे. एकीकडे रहिवाशांवर अन्याय केला जात असताना दुसरीकडे खासगी विकासकाला, अदानीला मात्र अधिकाधिक कसा नफा मिळेल याची काळजी घेण्यात आली आहे. हा आमच्यावर अन्याय असून आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत.
नीलेश प्रभू, सचिव, मोतीलाल नगर विकास समिती
३७०० रहिवाशांचे पुनर्वसन
मोतीलाल नगरमध्ये ३७०० गाळे असून तेथील रहिवाशांचे पुनर्वसन एकूण ५ लाख ८४ चौ. मीटर जागेवर करण्यात येणार आहे. निवासी रहिवाशांना १६०० चौ. फुटांची घरे तर अनिवासी रहिवाशांना ९८७ चौ. फुटांचे व्यावसायिक गाळे दिले जाणार आहेत. मात्र त्याच वेळी अदानीला सर्वाधिक १८ लाख ८० हजार चौ. मीटर इतके क्षेत्र विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.