दिवस वारीचे आहेत. अभंगांच्या गजराचे आहेत. अशा वेळी ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ हा तुकोबांचा अभंग समजा ऐकायला नाही मिळाला तरी, तो ‘पाहण्याची’ संधी मुंबईच्या कलादालनांत, विविध कलाकृतींतून याही आठवडय़ात मिळते आहे. विशेषत: ‘प्रोजेक्ट ८८’ या कलादालनात गोवर्धन अॅश , प्राजक्ता पोतनीस, गीव्ह पटेल यांची चित्रं आणि तेजल शहाची छायाचित्रं यांचं प्रदर्शन भरलं आहे, त्यातून जीवनातल्या सुखदु:खांकडे, मानवी गुणदोषांकडे तसंच स्वप्नांकडे किंवा मनोव्यापारांकडे पाहण्याची ‘मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमतां’ अशी तटस्थ, बुद्धिनिष्ठ वृत्ती दिसून येईल.
या प्रदर्शनात ३३ पैकी २० चित्रं १९५०च्या दशकातल्या ‘कोलकाता ग्रुप’चे चित्रकार गोवर्धन अॅश यांची आहेत. या ग्रुपच्या समाजकेंद्री, जीवनकेंद्री विचारविश्वाचा भाग होण्यापूर्वी गोवर्धन हेही केवळ छान छान दिसणारी निसर्गदृश्यं रंगवत होते. पण पुढे त्यांच्या चित्रांत याच निसर्गाच्या सोबतीनं जगणारी आणि प्रसंगी दुष्काळासारखे निसर्गानं केलेले अत्याचार निमूट सहन करणारी माणसं आली. ती माणसं रंगवण्यासाठी आता निराळी, जोरकस पद्धत हवी असं शैलीचं आत्मभान गोवर्धन अॅश यांना येऊ लागलं.. हा प्रवास या चित्रांतून दिसून येतो. प्राजक्ता पोतनीसची इथली तीन मोठी चित्रं घराच्या आत आणि बाहेर, वास्तव आणि ‘वाटलेलं’ (ते नेहमी कल्पितच असेल असंही नाही, पण वास्तवापेक्षा निराळं असेल..) असा फरक एकाच वेळी दाखवून जरी विरोधाभासाचा परिणाम साधत असली, तरी तो परिणाम अगदी हळुवारपणे प्रेक्षकावर होईल, अशी काळजी प्राजक्ता पोतनीस यांनी घेतली आहे. तेजल शाह यांची चार मोठय़ा आकारातली छायाचित्रं नाटकातल्यासारखी मुद्दाम पोषाख करवून, ‘पोज’ देऊन काढलेली आहेत . ‘मनोविकार व त्यावरील उपचार यांविषयीची गेल्या शतकातली युरोपीय संकल्पना’ हा या छायाचित्रांचा वण्र्य-विषय आहे. पण याच विषयावर नीत्शे, लाकान या तत्त्वज्ञांनी जी अभ्यासपूर्ण मतं मांडली, ती सूचित करणं हाही या छायाचित्रांचा हेतू असावा, असं वाटतं. तेजल यांचाच पाच लहान छायाचित्रांचा संचही इथं आहे. त्यातल्या सर्व प्रतिमा त्यांच्याच यापूर्वीच्या व्हिडीओ- कलाकृतींमधून आलेल्या असाव्यात. त्यात कचऱ्याचं वास्तव आणि दुसऱ्या जगात जगण्याची स्वप्नं, असं दोन्ही आहे.. याला ‘भ्रमदृश्यं’ (हॅल्युसिनेशन) असं तेजल म्हणतात.
गीव्ह पटेल यांचं ‘क्रोज’ हे अवघं एकच चित्र या प्रदर्शनात असलं, तरी त्यातलं मानवी जीवनाबद्दलचं रूपक इतकं प्रभावी आहे की ते चित्र कायम लक्षात राहील. ‘एकाचे मरण, दुसऱ्याचा लाभ’ हे सूत्र या चित्रात आहे.
कुलाबा फायर स्टेशन या बसस्टॉपनंतरच्या रस्त्यावर (मुकेश मिलची गल्ली) पुढे महापालिका मराठी शाळेच्या समोर ‘बीएमपी कम्पाऊंड’ या बैठय़ा गोडाऊनवजा इमारतीत ही गॅलरी असून प्रदर्शनाचा आज (२९ जून) अखेरचा दिवस आहे.
इतिहासाचे आरसे
मॅन रे ( जन्म १८९० , मृत्यू १९७६ ) हे नाव दृश्यकलेच्या इतिहासात अजरामर झालं, ते त्यांनी फोटोग्राफीत केलेल्या प्रयोगांमुळे. मॅन रे भारतात कधीच आले नाहीत, इंदूरचे शासक यशवंतराव होळकर- द्वितीय यांचा अपवाद वगळता भारतीय व्यक्तींचे फोटोसुद्धा रे यांनी काढले नसतील. तरीही कॅमेरा न वापरता थेट डार्करूममध्ये निगेटिव्ह डेव्हलप करताना प्रतिमा उमटवून त्यांनी केलेले ‘रायोग्राफ’सारखे प्रयोग, फोटोशॉप वगैरे काही नसताना तस्साच परिणाम साधणारे ‘फोटोग्राम’ असे प्रयोग १९२० ते १९४०च्या दशकांत अत्यंत कलात्मकतेने केल्यामुळे मॅन रे हे नाव इतिहासात अजरामर झालं. इतकं की, चित्रकला / फोटोग्राफीचे भारतीय विद्यार्थीही त्याचा अभ्यास करतात.
या मॅन रेच्या ४५ छाया-चित्रांचं प्रदर्शन गेटवे ऑफ इंडियानजीकच्या ‘धनराज महल’ या (चिनी इमारत भासणाऱ्या) संकुलामधल्या जरा आतल्या कोपऱ्यात असलेल्या ‘तर्क’ या खासगी कलादालनात १ जुलैपर्यंत भरलं आहे. मॅन रेच्या एवढय़ा कलाकृती एकत्रितपणे भारतात प्रथमच पाहायला मिळत आहेत, हे विशेष.
या दुमजली दालनाच्या खालच्या मजल्यावर बव्हंशी व्यक्तिचित्रणात्मक फोटो आहेत . ‘व्यक्तींचे’ या सोप्या शब्दाऐवजी व्यक्तिचित्रणात्मक म्हणणंच अधिक योग्य; कारण उत्तम व्यक्तिचित्रणात जसा त्या-त्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करून दृश्यनिर्मिती केलेली असते, तसाच विचार आणि तशीच कृती या फोटोंतूनही दिसते. मॅन रे हा जन्मानं अमेरिकी असला, तरी १९२०च्या दशकात पॅरिसला येऊन राहिला होता. तेव्हाचं पॅरिसचं वातावरण डाडा, सर्रिआलिस्ट, क्युबिस्ट कलाचळवळींनी भारलेलं होतं. मॅन रे हा ‘भूतकाळ विसरून’ पॅरिसमध्ये आला आणि वास्तवातीत कल्पनांकडे धाव घेणाऱ्या ‘सर्रिअॅलिझम’शी त्याचा सांधा जुळला. ‘डाडा’ चळवळीचा महत्त्वाचा प्रणेता मार्सेल द्युशाँ हा रेचा जवळचा मित्र, तर जॉर्जेस ब्राक, पाब्लो पिकासो, ज्याँ मिरो, साल्वादोर दाली हे चित्रकार किंवा ज्याँ कॉक्टय़ू, आंद्रे ब्रेताँ हे कलाचिंतक, यांच्याशी जवळची ओळख. या सर्वाचे फोटो इथं आहेत. खुद्द मॅन रेची तीन आत्म-छायाचित्रं (होय! सेल्फी!!) इथं मांडली आहेत, त्यापैकी एक ‘सेल्फ पोट्र्रेट विथ कॅमेरा’ असं आहे. पिकासोचा पुढे प्रख्यात झालेला (गालावर डावा हात ठेवून टक्क समोर बघणारा) फोटो इथं ओळखीचा वाटेल.
तसंच वरच्या दालनात अनेकांना, पाठमोरी बसलेल्या नग्न स्त्रीच्या पाठीवर व्हायोलीन या वाद्यात हवा खेळावी म्हणून असलेले उभट ‘एस’ या इंग्रजी अक्षरासारखे नक्षीदार आकार (त्यातून स्त्री आणि व्हायोलीन या आकारांचं ऐक्य) असं एक छाया – चित्र (हे साधं ‘छायाचित्र’ नाही, छायाचित्रण आणि चित्रकला यांचा संयोग त्यात आहे, म्हणून ‘छाया-चित्र’ ) काही जणांना आठवत असेल.. तेही मॅन रेचंच, तेही इथं आहे. फोटो डेव्हलप करताना त्यावर मुद्दाम प्रकाश पाडून प्रिंट अधिक पांढरी करणं (सोलरायझेशन) यासारखे काही प्रयोग मॅन रे यांनी केले, त्यांची उत्तम उदाहरणं ठरतील असे काही फोटो या प्रदर्शनात आहेत. ‘द गिफ्ट’ या नावाचं एक शिल्प मॅन रे यांनीच तयार केलं होतं (‘घडवलं’ नव्हतं! तयार वस्तू म्हणून मिळणाऱ्या इस्त्रीला तयार वस्तूच असलेले खिळे जोडून, ते ‘तयार केलं’ होतं), त्या खिळेवाल्या इस्त्रीचा फोटो इथं आहे. हे सर्व फोटो, ‘इस्टेट ऑफ मॅन रे’कडून स्पेनच्या ‘मोंडो गॅलेरिया’ या कलादालनामार्फत मुंबईच्या ‘तर्क’ गॅलरीपर्यंत आणण्यात मूळचे फ्रेंच पण आता मुंबईवासी फोटोग्राफी-संघटक मॅथ्यू फॉस यांची मदत झाली, असं ‘तर्क’च्या संचालिका हिना कपाडिया यांनी सांगितलं. कोणत्याही कारणानं का होईना, इतिहासाचे आरसेच ठरणारे हे फोटो मुंबईत आले याचा आनंदच आहे.