मुंबईतली खासगी मालकीची कलादालनं एकमेकांच्या साथीनं उभी राहिली, यामागचं एक कारण ‘कलाक्षेत्रालाही २००८ पासून बसू लागलेला मंदीचा फटका’ हे होतं.. पण यातून एक नवी व्यवस्था उभी राहिली. या व्यवस्थेची दोन फळं म्हणजे दरवर्षी हिवाळ्यात होणारा ‘मुंबई आर्ट गॅलरी वीकेन्ड’ आणि दर महिन्यातून एका (बहुतेकदा दुसऱ्या आठवडय़ातल्या) गुरुवारी ‘आर्ट नाइट थर्सडे’! यंदाची ही ‘आर्ट नाइट’ ११ मे रोजी- म्हणजे हा मजकूर वाचकांहाती पोहोचेल त्याच दिवशी आहे आणि ‘केमोल्ड (प्रिस्कॉट रोड) आर्ट गॅलरी’मधलं एक निराळंच प्रदर्शन, तसंच दृश्यकलावंत सचिन बोंडे यांनी नियोजित केलेलं तरुण मुद्राचित्रकारांचं प्रदर्शन, ही नवी प्रदर्शनं या ‘आर्ट नाइट’पासून सुरू होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘केमोल्ड’मधलं प्रदर्शन वेगळं म्हणजे फारच वेगळं आहे. ते चित्र/ शिल्प/ व्हिडीओकला/ मांडणशिल्प अशा नेहमीच्या वर्णनातलं तर नाहीच. ते ‘माहितीदर्शन’ आहे. ही माहिती आहे भारतातल्या ‘लॅण्डस्केप डिझाइन’च्या इतिहासाची! मोगलकाळापासूनच्या बागा आपल्या देशात आजसुद्धा आहेत. त्यांत नवी भर पडते आहेच. ‘बाग’ या संकल्पनेचा आता विस्तार होऊन उंचसखलता, पाण्याचे प्रवाह यांचा वापर वास्तुरचनांसाठी केला जातो आहे. त्यामागची विचारसूत्रं शोधणारं हे प्रदर्शन आहे. प्रदर्शनात वाचण्यासाठी भरपूर मजकूर आहे, त्यामुळे केमोल्ड गॅलरीत जाताना वेळ ठेवूनच जाणं बरं. मुंबईत फोर्टमध्ये, खादी भांडाराच्या बरोब्बर पिछाडीला असलेल्या रस्त्यावर ‘क्वीन्स मॅन्शन’ नावाच्या इमारतीत, (लिफ्टनं) तिसऱ्या मजल्यावर ही गॅलरी आहे आणि प्रदर्शन २७ मेपर्यंत खुलं (रविवारी मात्र बंदच) आहे. निसर्ग आणि वास्तुरचना यांचा एकत्रित अनुभव भारतात कसकसा मिळत गेला, त्या क्षेत्रात नवं काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी अवश्य पाहावं असं हे प्रदर्शन आहे.

‘केमोल्ड’च्या तोलामोलाच्या खासगी गॅलऱ्या म्हणजे ‘पंडोल’ आणि ‘साक्षी’. यापैकी ‘पंडोल आर्ट गॅलरी’नं केमोल्डसारखीच मोठ्ठी जागा आता बॅलार्ड इस्टेट भागात- ‘टायगर गेट’ जवळच्या रस्त्यावर घेतली आहे. तिथं आनंदजीत राय या बडोदेवासी चित्रकारानं कौशल्य आणि बुद्धी यांचा मिलाफ करून घडवलेल्या जलरंगचित्रांचं प्रदर्शन भरलं आहे. अनवट पक्षी आणि त्यांच्या डोळ्यांच्या जागी कॅमेरा, अशी एक चित्रमालिका इथं दिसते. कॅमेऱ्याच्या रंगकामातलं कौशल्य तर पुन:पुन्हा पाहावं असं आहेच. पण कॅमेऱ्यातून काय सांगायचंय हा प्रश्न त्या आकर्षकपणामुळे पडतो आणि त्याचं उत्तर चित्रातच- पक्ष्याखेरीजचे आणि रोजच्या जगण्यातले असे जे आकार दिसतात, त्यातून मिळतं. हे प्रदर्शन २६ मे पर्यंत असल्यानं त्याबद्दल पुढल्या आठवडय़ात सविस्तर जाणून घेऊ. ‘साक्षी गॅलरी’ आहे कुलाब्याच्या रेडिओ क्लबकडे जाणाऱ्या रस्त्यावर, तिथं ३१ मे पर्यंत ‘हिअर बी द ड्रॅगन्स अ‍ॅण्ड अदर कोडेड लॅण्डस्केप्स’ अशा लांबलचक नावाचं प्रदर्शन दिल्लीवासी कलासमीक्षक मीरा मेनेझिस यांनी नियोजित केलं आहे. प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच, एका डोंगरातून जाणाऱ्या घाटरस्त्यासारखं काहीतरी दिसतं. हा डोंगर भारतातल्या माणुसकीची जी काही दयनीय अवस्था झालीय तिच्यामागचे टप्पे दाखवणारा आहे. अंजू दोडिया, नीलिमा शेख, अशा चित्राचा विचार अभिनव पद्धतीनं करणाऱ्या (म्हणून महत्त्वाच्या) चित्रकर्तीची चित्रं या प्रदर्शनात आहेत.

तरुण चित्रकारांची प्रदर्शनं

‘पंडोल’कडून जर चालत ‘साक्षी’कडे निघालात (जे दुपारच्या उन्हात अशक्यच) तर बरोब्बर मधल्या टप्प्यावर- ‘लायन गेट’ लागतं. लायन गेटच्या समोरच्या ‘रॅम्पार्ट रो’ या रस्त्यावर- ‘अडोर हाऊस’ या पहिल्याच इमारतीत पहिल्या मजल्यावर ‘आर्टिस्ट्स सेंटर’मध्ये १५ चित्रकारांचं समूहप्रदर्शन येत्या रविवापर्यंत (हे मात्र रविवारीही खुलं!)आहे. तिथं वळल्यास भाग्यश्री सुतार, अमृत सोनवणे, भूषण मेहेर, कुणाल पाटील, शुद्धोदन कांबळे, लारीसा कोर्डेरिओ आदींची चित्रं पाहायला मिळतील. ‘निरनिराळ्या विचारांची मैत्री’ ही या प्रदर्शनाची मध्यवर्ती कल्पना आहे. लायन गेटपासून रीगल सिनेमाचा चौक ओलांडल्यावर सरळ रस्त्यानं न जाता जर उजवीकडल्या ‘नाथालाल पारीख मार्गा’वर वळलात, तर ‘क्लार्क हाऊस’ या दालनात सचिन बोंडे यांनी नियोजित केलेलं मुद्राचित्रांचं प्रदर्शन सुरू आहे.

जहांगीरमधले पुजारी (आणि भाविकही!)

  • ‘जहांगीर’ आर्ट गॅलरीत कलाध्यापनाचा दीर्घ अनुभव असलेले डी. जी. पुजारी यांच्या मुद्राचित्रांचं प्रदर्शन सुरू आहे. ‘प्लेटोग्राफ’ या तंत्रानं ही चित्रं सिद्ध झाली आहेत. चित्रांमधली अमूर्ततेकडे झुकणारी निसर्गदृश्यं, ही चित्रकाराच्या अनुभवाची साक्ष देणारी आहेत. पण या प्रदर्शनात महत्त्वाचं आहे ते तंत्र. जस्त वा अन्य धातूच्या प्लेटवर कोरून केलेलं आणि कोरीव भागातच रंग ठेवलेलं काम कागदावर ‘मुद्रा’ म्हणून उमटण्यासाठी त्यावर विशिष्ट जाड रोलर फिरवावा लागतो. तसं न करता, प्लेटभर रंगच असू देऊन ‘लिथोग्राफी’शी जवळ जाणाऱ्या तंत्रानं या चित्रांची मुद्रा घेण्यात आली आहे, असं उपलब्ध वर्णनावरून समजतं.
  • ‘जहांगीर’च्याच सभागृह दालनात मयूरा मांढरे, धनश्री सुजीत, जितेंद्र थोरात, समीर गोरडे या पुण्यातल्या चौघा चित्रकारांचं समूहप्रदर्शन भरलं आहे. धनश्री यांच्या अमूर्त चित्रांमध्ये रंग एकमेकांवर आच्छादले गेल्यासारखे दिसतात आणि चित्रांमधल्या रंगीत अवकाशातून जी अनंताची प्रतिमा तयार होत असते ती या रंगांची सखोलता जाणवल्यावर आणखी मनात भिनते. मयूरा मांढरे यांनी (आधुनिक) ‘अष्टनायिका’ या विषयावर चित्रमालिका केली आहे. तर जितेंद्र थोरात हे ‘टीबॅग’सारख्या अपारंपरिक साधनांचाही वापर करण्यासाठी प्रसिद्ध (बॉम्बे आर्ट सोसायटी- गव्हर्नर्स मेडल मिळालेले). यंदा त्यांनी आणखी काही प्रयोग केले आहेत गोरडे यांचे चित्र सोबत आहे.
  • ‘जहांगीर’च्याच वरच्या मजल्यावर अनेकदा बातम्यांतून प्रसिद्धी मिळालेले (विशेषत भारतातलं सर्वात लांब चित्र केल्याच्या विक्रमाची बातमी) अहमदनगरचे शिल्पकार-चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या काही कलाकृतींचं प्रदर्शन सुरू आहे.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai art gallery weekend