मुंबई : जागतिक स्तरावर ८१ लाख मृत्यू वायू प्रदूषणामुळे होत असून त्यातील २५ टक्क्यांहून अधिक म्हणजेच २० लाखांहून अधिक मृत्यू भारतात होत असल्याचे अर्थ ग्लोबलच्या अहवालातून समोर आले आहे. तसेच जगातील १५ सर्वात प्रदूषित शहरांपैकी १२ शहरे ही भारतातील असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अर्थ ग्लोबल ही मुंबई आणि लंडन स्थित एक संशोधन संस्था भारतातील वायू प्रदूषणासंदर्भात विविध पातळीवर सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करते. दरवर्षी नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. या पार्श्वभूमीवर अर्थ ग्लोबलने नोव्हेंबर २०२४ मध्ये वायू प्रदूषणासंदर्भात इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स (आयव्हीआर) प्रणाली वापरून देशभर सर्वेक्षण केले होते. त्यात बिहार, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश होता. सर्वेक्षण अहवालानुसार श्वसनाच्या संसर्गामुळे होणारे ३० टक्के मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच हृदय रोगाशी संबंधित २८ टक्के मृत्यूंसाठी वायू प्रदूषण कारणीभूत आहे. आरोग्याच्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने श्वसन विकार, हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित तक्रारी जास्त असल्याचे या सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यात प्रदूषणामुळे आरोग्य समस्या उद्भवणाऱ्यांमध्ये लहान मुले आणि वृद्धांचे प्रमाण अधिक आहे. तसेच सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ५५ टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांनी कुटुंबातील किमान एका सदस्याला प्रदूषणामुळे श्वसनाचा आजार झाल्याचे सांगितले. त्याचबरोबर श्वसनाच्या तक्रारीमुळे शाळेत तसेच कामावर ६५ टक्के नागरिक जाऊ शकले नाहीत. यामध्ये शाळा, कामाला तीन दिवसांपेक्षा अधिक सुट्टी घेतलेले ४०.९ टक्के विद्यार्थी आहेत. तीन दिवसांपेक्षा कमी सुट्टी घेतलेले २५.५ टक्के आहेत. त्यात १८ ते ३० वयोगटातील एकूण ७० टक्के जणांना किमान एक दिवस शाळा, कामाला मुकावे लागले आहे.
दरम्यान, वायू प्रदूषणात वाढ होत असताना आरोग्याच्या समस्येतही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि हरियाणासारख्या शहरांमध्ये ऑनलाईन शाळा घेणे, घरून काम करण्याची मुभा दिली जाऊ शकते. मात्र, छोट्या शहरांमध्ये मोल मजुरी करणाऱ्या नागरिकांसाठी घराबाहेर जाऊन काम करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे या नागरिकांना वायू प्रदूषणाचा अधिक त्रास होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच ही कुटंबे हवा शुद्धीकरण यंत्र आदी संरक्षणात्मक उपायांचा वापर करण्याइतकी सक्षम नसतात.