लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मुंबई-बदलापूर अंतर केवळ ६० मिनिटांत, तर बदलापूर-नवी मुंबई अंतर अवघ्या ३० मिनिटांत पार करणे येत्या काही वर्षांत सहज शक्य होईल. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बदलापूर- हेदुटणे, विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका असा प्रवेश नियंत्रण मार्ग (अॅक्सेस कंट्रोल रोड) बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच २०.६ किमी लांबीच्या या मार्गाचा सविस्तर आराखडा तयार करण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.

दरम्यान, त्यात आठ पदरी प्रवेश नियंत्रण मार्गामध्ये चार अंतरबदल मार्ग, पाच वाहन भुयारी मार्ग आणि तीन किमी लांबीच्या एका बोगद्याचा समावेश असेल. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवली शहरांचा विकास झपाट्याने होत असून ही शहरे थेट मुंबई, नवी मुंबईशी जोडत प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने प्रवेश नियंत्रण मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार हा मार्ग २०.६ किमी लांबीचा असणार असून यासाठी अंदाजे १० हजार, ८३३ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग मुंबई-बडोदे द्रुतगती मार्गावरील चामटोली गाव, बदलापूर येथून सुरू होऊन विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेतील हेदूटणे आंतरबदल मार्गावर संपेल. २०.६ किमी लांबीच्या या मार्गात ३.९५ किमीचा एक ‘व्हायाडक्ट’ असेल. तर ताहुली हिल्स- शिरगाव दरम्यान ३ किमी लांबीच्या बोगद्याचाही यात समावेश असणार आहे. त्याचवेळी मुंबई – बडोदे मार्गावरील चामटोली, बदलापूर, हेदुटणे आणि कल्याण रिंग रोड असे पाच अंतरबदल मार्ग असणार आहेत. त्यामुळे प्रवेश नियंत्रण मार्गावरून मुंबई, नवी मुंबईसह कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरमधील अनेक परिसरातही जलदगतीने पोहचता येणार आहे.

बदलापूर – हेदुटणे प्रवेश नियंत्रण मार्गाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मार्गात पाच वाहन भुयारी मार्गाचाही समावेश आहे. अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली आणि काटई नाका या पाच ठिकाणी वाहन भुयारी मार्ग असणार आहेत. या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी नुकतीच निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. शक्य तितक्या लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करून आराखडा तयार करण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.

मार्गासाठी २०० हेक्टर भूसंपादन

२०.६ किमी लांबीचा प्रवेश नियंत्रण मार्ग कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर अशा अनेक शहरातून जाणार आहे. या मार्गात बोगद्यासह अनेक प्रकारच्या बांधकामाचा समावेश आहे. त्यामुळे या मार्गाच्या बांधणीसाठी एमएमआरडीएला या सर्व शहरातील तब्बल २०० हेक्टर जागा संपादीत करावी लागणार असल्याचेही एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. सविस्तर आराखडा तयार झाल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.