वांद्रे पूर्वेला शासकीय वसाहतीतील एकाच कुटुंबातील चौघांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजेश भिंगारे (४५) यांनी पत्नी आणि दोन मुलांसह राहत्या घरी आत्महत्या केली. शासकीय वसाहतीतील इमारत क्रमांक दोनमध्ये ही घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गरीबी आणि नैराश्याला कंटाळून या संपूर्ण कुटुंबाने आपले जीवन संपवले. आज सकाळपासून त्यांच्या घरातून कोणीही बाहेर पडले नाही म्हणून शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यांना घरातील चारही सदस्य मृतावस्थेत आढळले.

शेजाऱ्यांनी लगेच खेरवाडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये मागच्या काही काळापासून आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत आहोत असे लिहिले होते.

राजेश भिंगारे चर्चगेट येथील रेशनिंग ऑफिसमध्ये शिपायाची नोकरी करत होते. त्यांची पत्नी अश्विनी गृहिणी होती. त्यांचा मुलगा तृषार (२३) नोकरीला होता आणि दुसरा मुलगा गौरांग (१९) कॉलेजमध्ये शिकत होता. राजेश आणि त्यांच्या पत्नीने जेवणात विष मिसळून आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

सध्याच्या घडीला ही आत्महत्या वाटत आहे. भिंगारे यांनी चिठ्ठीमध्ये आर्थिक अडचणींमुळे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे असे खेरवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai bandra govt colony family suicide