मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारे गोपाळकृष्ण गोखले पूल आणि सी. डी. बर्फीवाला पूल यांची जोडणी विविध कारणांमुळे रखडली आहे. त्यामुळे सध्या या बर्फीवाला पुलाकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर उच्चभ्रू वस्तीतील रहिवाशांच्या गाड्या उभ्या करण्यासाठी करत आहेत. तसेच क्रिकेट खेळण्यासाठी, बेघरांना झोपण्यासाठी, तर कपडे वाळत घालण्यासाठी या पुलाच्या पोहोच रस्त्याचा वापर केला जात आहे.
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल धोकादायक ठरल्यामुळे नोव्हेंबर २०२२ मध्ये वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर या पुलाचे पाडकाम, बांधकाम सुरू झाले. गेली दोन वर्षे ते सुरू आहे. अजूनही हे काम पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे. हा पूल बंद असल्यामुळे अंधेरी पश्चिमेला असलेला जुना बर्फीवाला पुलही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
गोखले पुलाची एक बाजू सुरू झाली असली, तरी सी. डी. बर्फीवाला पूल आणि गोखले पूल यांची पातळी नवीन बांधकामामुळे वरखाली झाली आहे, तसेच त्यात अंतर पडले आहे. त्यामुळे हे दोन पूल कसे जोडायचे याबाबत उच्चस्तरीय खल सुरू आहे. मात्र, या काळात बर्फीवाला पूल हा काही नागरिकांसाठी हक्काची जागा बनला आहे. या पुलाच्या पोहोच रस्त्याचा भाग हा या परिसरातील नागरिकांनी व्यापला आहे.
हेही वाचा – मतटक्का वाढवण्याचे लक्ष्य; आयोगाला मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरबाबत चिंता; जनजागृतीवर भर
हक्काचे वाहनतळ, नागरिकांना त्रास
या पुलाच्या पोहोचमार्गावर गाड्या, ट्रक उभे केले जातात, तर कधी परिसरातील मुले तेथे क्रिकेट खेळतात. आजूबाजूच्या झोपडपट्टीतील रहिवासी पुलाच्या कठड्यावर कपडे वाळत घालतात, उच्चभ्रू वसाहतींमधील रहिवाशांच्या मोटारगाड्यांसाठी हे हक्काचे वाहनतळ झाले आहे. तर जवळच असलेल्या चारचाकी गाडीच्या एका शोरुमच्या गाड्याही इथे उभ्या असतात. त्यामुळे हा एक वेगळाच त्रास या परिसरातील नागरिकांना होऊ लागला आहे. पुलाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हा त्रास आणि या मार्गाचे विद्रुपीकरण सुरू राहणार का असा सवाल अंधेरी लोखंडवाला रहिवासी संघटनेचे धवल शाह यांनी केला आहे.