मुंबई : मुंबई – बडोदा द्रुतगती महामार्गाअंतर्गत माथेरानच्या डोंगराखालून जाणाऱ्या ४.४१ किमी लांबीच्या दुहेरी बोगद्याचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) या बोगद्याच्या भुयारीकरणाच्या कामाला वेग दिला असून फेब्रुवारी – ऑक्टोबरदरम्यान दीड किमी लांबीच्या भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या दुहेरी बोगद्याचे काम सप्टेंबर- ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे एनएचएआयचे नियोजन आहे. हा बोगदा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर अंबरनाथमधील भोज गाव आणि पनवेलमधील मोरबेदरम्यानचे अंतर एक ते दीड तासांऐवजी केवळ तीन-चार मिनिटात पार करता येणार आहे. तसेच मुंबई – बडोदा प्रवास केवळ साडेचार तासांत पूर्ण करता येणार आहे.
देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईतील अंतर कमी करण्यासाठी ‘एनएचएआय’ १३८६ किमी लांबीचा मुंबई – दिल्ली द्रुतगती महामार्ग बांधत आहे. याच महामार्गातील बडोदा – मुंबई (मोरबे, पनवेल) हा एक टप्पा आहे. या ४४० किमी लांबीच्या मुंबई – बडोदा द्रुतगती महामार्गाचे काम बडोदा – तलासरी आणि तलासरी – मोरबे, पनवेल अशा दोन टप्प्यात करण्यात येत आहे. तलासरी – मोरबे टप्प्याचे काम ‘अ’, ‘ब’, ‘क’ या तीन टप्प्यात सुरू आहे. टप्पा ‘क’मध्ये अंबरनाथमधील भोज – पनवेलमधील मोरबेदरम्यान दुहेरी बोगदा बांधण्यात येत आहे. ४.४१ किमी लांबीच्या आणि ५.५ मीटर उंच, तसेच २१.४५ मीटर रुंदीच्या या बोगद्याच्या भुयारीकरणाला फेब्रुवारीत सुरुवात करण्यात आली. दुहेरी बोगद्याचे चारही बाजूने (दोन्ही बोगद्याच्या दोन्ही टोकाकडून ) काम सुरू आहे. फेब्रुवारी – ऑक्टोबरदरम्यान बोगद्याच्या चारही बाजूने मिळून दीड किमी लांबीचे भुयारीकरण पूर्ण झाल्याची माहिती ‘एनएचएआय’मधील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली.
हेही वाचा >>>वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा आणि महाविद्यालये वाढणार; राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा निर्णय
चार-चार मार्गिकांच्या या दुहेरी बोगद्याचे काम अंत्यत आव्हानात्मक आणि अवघड आहे. हा दुहेरी बोगदा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील अशा माथेरानच्या डोंगराखालून जात आहे. कडक दगड फोडून भुयारीकरण करण्यासाठी ‘एनएचएआय’ अत्याधुनिक एसटीएम तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. दोन्ही बोगद्याच्या दोन्ही बाजूने भुयारीकरण करण्यात येत आहे. स्फोट करून खडक फोडून डोंगराखालून भुयारीकरण केले जात आहे. या बोगद्याचे काम सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल अशी माहितीही ‘एनएचएआय’मधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. बडोदा – मुंबई द्रुतगती महामार्ग डिसेंबरमध्ये पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.
हा दुहेरी बोगदा पूर्ण झाल्यानंतर भोज – मोरबे अंतर केवळ तीन ते चार मिनिटात पार करता येणार आहे. आजघडीला हे अंतर पार करण्यासाठी एक ते दीड तास लागतो. सध्या अनेक गावांना वळसा घालून प्रवास करावा लागतो. मुंबई – बडोदा द्रुतगती महामार्ग डिसेंबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल होईल, असेही त्यांनी सांगितले. हा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबई – बडोदा अंतर कमी होईल. पण त्याच वेळी वसई, ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्नही सुटण्यास मदत होईल. त्यामुळे हा महामार्ग मुंबई महानगर प्रदेशाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढे हा महामार्ग विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गाला जोडण्यात येणार आहे.