मुंबईतील मालाड परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी २० जुलै रोजी एका अज्ञान व्यक्तीने फोनवरून ही धमकी दिली. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील मालाड परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचं सांगत एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. फोनवरील व्यक्तीने तक्रारदार व्यावसायिकाकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितली. २० जुलै रोजी एका खासगी क्रमांकावरून फोन आला होता, असं तक्रारीत म्हटलं आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीतील तीन सदस्य सध्या तुरुंगात आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे आम्हाला तातडीने २० लाख रुपये दे, अशी धमकी फोनवरील व्यक्तीने दिली. यानंतर संबंधित व्यावसायिकाने दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे दिंडोशी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.