मुंबईः कुर्ला पश्चिमेला झालेल्या बेस्ट बस अपघाताप्रकरणी चालक संजय दत्ता मोरे (५४) याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत मंगळवारी पोलिसांनी अटक केली. भरधाव वेगात धावणाऱ्या बसने दिलेल्या धडकेत सात जणांचा मृत्यू झाला असून ४२ जण जखमी झाले आहेत. पोलीस याप्रकरणी आरोपी मोरेची मानसिक स्थिती व बेस्ट बस चालवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेतले होते का याची पडताळणी करणार आहे. याशिवाय अपघातग्रस्त बसची परिवहन विभागामार्फत तपासणी करण्यात येणार आहे.
कुर्ला पश्चिमेतील एस.जी. बर्वे मार्गावरील अंजुमन इस्लाम हायस्कुल समोर सोमवारी रात्री बेस्ट बस पादचारी आणि वाहनांना चिरडून एका कमानीवर आदळली. या अपघातात सात जण ठार, तर ४९ जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. कुर्ला – अंधेरी दरम्यान धावणाऱ्या मार्ग क्रमांक ३३२ बसने वाहने आणि पादचाऱ्यांना चिरडताच परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिक रस्त्यावर सैरावैरा पळू लागले. घटनेचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बसचालक व वाहकाला ताब्यात घेऊन व्हॅनमध्ये बसवले. दोघांनाही कुर्ला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यावेळी चालक मोरेविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०५, ११०, ११८(१), ११८(२), ३२४(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मोरेला मंगळवारी कुर्ला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालायाने त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
हेही वाचा >>> भाडेतत्वावरील बसमुळे ‘बेस्ट’ धोक्यात; बसच्या देखभाल-दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह
घटनास्थळाची न्यायवैधक तज्ज्ञांनी तपासणी केली असून तज्ज्ञांनी तेथे सांडलेले रक्ताचे नमुने गोळा केले. दरम्यान अपघातात मृत झालेल्या महिलेच्या अंगावरून दागिने चोरीला गेल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. त्याचीही तपासणी पोलीस करणार आहेत.
आरोपी चालकाकडून नुकतीच इलेक्ट्रीक बस चालवण्यास सुरूवात?
आपण १ डिसेंबरपासून इलेक्ट्रीक बस चालविण्यास सुरुवात केल्याचे अपघातग्रस्त बसचा चालक संजय मोरेने चौकशीत सांगितले. याबाबत कुर्ला पोलीस बेस्ट प्रशासनाकडून माहिती घेणार आहे. तसेच त्याने इलेक्ट्रीक बस चालवण्याचे १० दिवसांचे प्रशिक्षण घेतले होते, अशी माहिती एका साक्षीदाराच्या जबाबात पोलिसांना मिळाली. आरोपी चालकाकडे जड वाहने चालवण्याचा चालक परवाना आहे. गेल्या चार वर्षांपासून बेस्टला भाडे तत्त्वावर बस पुरवणाऱ्या विविध कंत्राटदारांकडे मोरे काम करीत होता. मोरेला यापूर्वी क्लच व गिअर असलेल्या बस चालवण्याचा अनुभव होता, मात्र त्याने नुकतीच इलेक्ट्रिक बस चालवण्यास सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितले. अवजड वाहने चालवण्याचा चांगला अनुभव असल्यामुळे त्याला इलेक्ट्रीक बस चालवण्याचे १० दिवसांचेच प्रशिक्षण देण्यात आले होते, अशी माहिती मिळाली. त्याची तपासणी सध्या सुरू आहे. याशिवाय मोरेची मानसिक स्थितीचीही वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान सध्या कंत्राटी चालकांना बेस्टमार्फत १५ दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे, अशी माहिती मिळाली. त्याची पडताळणी पोलीस करणार आहेत. बेस्टने स्थापन केलेल्या समितीचा अहवालही याप्रकरणात महत्त्वाचा असून त्याच्या आधारावर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.
हेही वाचा >>> कुर्ला बस अपघातात ४३ जखमी, सात जणांचा मृत्यू; भाभा रुग्णालयात ३८, तर शीव रुग्णालयात ७ जणांवर उपचार
आरोपीला क्लच व गिअरची बस चालवण्याचा अनुभव होता. पण अपघाताच्या दिवशी आरोपी चालकाने क्लच समजून चुकून एक्सलेटर दाबल्यामुळे बस थांबण्याऐवजी तिचा वेग वाढला. आसपास वर्दळ असल्यामुळे त्याने रस्त्यावरूनच गाडी चालवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बसचा वेग कमी करण्यासाठी त्याने समोरच्या भिंतीला धडक दिला, अशी माहिती तपासात समजली असून त्याची पडताळणी करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
अपघातग्रस्त बसची परिवहन विभागाकडून तपासणी करणार
बेस्ट बसच्या अपघातात तेथील २१ मोटरगाड्या व एका हातगाडीचे नुकसान झाले. न्यायवैधक तज्ज्ञांनी संबंधित मोटर गाड्यांवर लागलेल्या बसच्या रंगाचे नमुने घेतले असून ते परिक्षणासाठी पाठवण्यात आले आहेत. बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का हे तपासण्यासाठी पोलीस परिवहन विभागाची मदत घेणार असून परिवहन विभागामार्फत या बसची तपासणी करण्यात येणार आहे. परिवहन विभागाच्या अहवालानुसार पुढील तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय अपघातग्रस्त वाहनाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या व्यक्तीचाही जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.