मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमातर्फे चालविण्यात येणाऱ्या भाडेतत्त्वावरील बस गाड्यांवरील कार्यरत कामगार, कर्मचाऱ्यांची पिळवणूक होते. तसेच बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध सुविधांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांना वंचित ठेवले जाते. याबाबत संघर्ष कामगार कर्मचारी युनियनतर्फे मंगळवारी आझाद मैदानात ‘समान काम, समान वेतन’ यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडण्यात येतील.

बेस्ट उपक्रमातील डागा ग्रुप, मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्यूशन्स, बी.व्ही.जी. इंडिया व इतर खासगी कंपन्यांमार्फत चालविण्यात येणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना ‘समान काम, समान वेतन’ या तत्वानुसार वेतन देणे आवश्यक आहे. तसेच सर्व कंत्राटी कामगारांना बेस्ट उपक्रमात कायमस्वरूपी घ्यावे. बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागात सार्वजनिक बस सेवा देण्यासाठी कायम सेवेत असलेल्या कामगारांचे आणि खासगी कंपन्याद्वारे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचे काम तंतोतंत सारखेच आहे. तसेच हे काम बारा महिने, कायम स्वरुपाचे असल्याने व काम कायम चालणारे असल्याने, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सारख्या समान काम असून त्याचे वेतन देखील सारखेच असले पाहिजे. या तत्वानुसार बेस्ट उपक्रमामधील कायम आणि नियमित कामगारांना लागू असलेले वेतनमान व इतर सेवाशर्ती तातडीने लागू करण्यात यावे, अशी मागणी संघर्ष कामगार कर्मचारी युनियनकडून करण्यात आली.

गेल्या दोन वर्षांपासून बेस्ट उपक्रम, महापालिका आयुक्त, संबंधित सेवा पुरवणाऱ्या संस्थांना संघर्ष कामगार कर्मचारी युनियनने पत्रे पाठविले. मात्र, अद्याप कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता आंदोलन करून, प्रशासनासमोर कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडण्यात येणार आहेत. ‘समान कामाला समान वेतन’ या तत्वाप्रमाणे सेवेच्या प्रथम दिवसापासून वेतनाची पुनर्निश्चिती करून तातडीने त्याप्रमाणे वेतन देण्यास सुरुवात करावी आणि संपूर्ण थकबाकीचे प्रदान करण्यात यावे, असे मत संघर्ष कामगार कर्मचारी युनियनकडून व्यक्त केले.

Story img Loader