मुंबई : गेल्या दोन आठवड्यांमध्ये मुंबईत बेस्ट बसच्या अपघातात १० जणांना प्राण गमवावे लागले. काही वेळा चालकांच्या चुकीमुळे, तर काही वेळा बेस्ट प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बेस्ट प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेल्या अनेक बसथांब्यांची दूरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी अत्यंत रुंद पदपथावरील बस थांब्यांवर गर्दीच्या वेळी प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. बहुतांश ठिकाणी बस थांब्यांऐवजी केवळ बस खांब उभारण्यात आले असून वाहनांच्या वर्दळीत जीव मुठीत घेऊन बसची वाट बघावी लागत आहे. काही ठिकाणी बेकायदा फेरीवाले, तर काही ठिकाणी अवैध वाहनतळ आदी विविध समस्यांमुळे बेस्ट प्रवाशांच्या डोक्यावर असुरक्षिततेची टांगती तलवार लटकत आहे.
हेही वाचा: तोटा कायम अन् अपघातही! ‘बेस्ट’ची संचित तूट आठ हजार कोटींवर!
मुंबईत बेस्ट बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखोंच्या घरात आहे. लोकल पाठोपाठ बेस्ट बसला प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळते. गेल्या दोन आठवड्यात मुंबईत बेस्ट बसगाड्यांच्या अपघातात १० जणांना प्राण गमवावे लागले. यादरम्यान बेस्ट प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्वस्त आणि सुकर प्रवासाची हमी देणाऱ्या बेस्ट बसबाबत प्रवाशांच्या मनात काही प्रमाणात असुरक्षितता निर्माण झाली आहे. बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध उपायोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी बेस्ट बस थांब्यांची सोय नसल्याने रस्त्यामध्येच वाहनांच्या वर्दळीत उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. पुरेशा जागेअभावी बहुतांश ठिकाणी केवळ बस क्रमांकांची माहिती देणारे खांब उभारण्यात आले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी जागा असूनही बस थांबे उभारले नाही. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच बेशिस्तपणे गाडी चालवणाऱ्या चालकांमुळे बेस्ट खांब्याच्या ठिकाणी अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. अनेक ठिकाणच्या थांब्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा आणि पावसाचा मारा सहन करत ताटकळत बेसची वाट पाहावी लागते. कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरील बसथांब्यावर प्रवाशांना अनधिकृत फेरीवाले, टॅक्सीच्या रांगा, बेशिस्त रिक्षाचालकांमधून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. दादर, भायखळा, वांद्रे, कुर्ला, बोरिवली रेल्वे स्थानकांच्या बाहेर टॅक्सी, रिक्षांच्या बेशिस्त पार्किंगमुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते.
हेही वाचा: मुंबई : वांद्रे रेल्वे स्थानक – वांद्रे वसाहत मेट्रो स्थानक वातानुकूलित बस सेवा सुरू
बेस्ट उपक्रमाने वाहकपदी महिलांची निवड, ऑनलाईन तिकीट, बसचे ट्रॅकिंग आदी विविध सुधारणा यंत्रणेत केल्या आहेत. मात्र, मूलभूत सुधारणा अद्यापही झालेल्या नाहीत. बेस्टचे कंत्राटीकरण झाल्यापासून बस चालकांकडून वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. बेशिस्तपणे गाडी चालवली जाते. अनेकदा थांब्यावर प्रवासी उभे असतानाही बस थांबविण्यात येत नाही. कंत्राटी चालक अनेक नियमांची पायमल्ली करीत आहेत.
देवेंद्र तांडेल, प्रवासी
गर्दीच्या वेळी दुमजली बसगाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. तसेच, गर्दीचा फायदा घेऊन अनेक समाजकंटक महिलांना त्रास देतात. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देवू नये, असा नियम करावा.
संतोष घोलप, प्रवासी
हेही वाचा: कांदा…शेतकऱ्याला १५ रु., ग्राहकाला ८० रु.; चार दिवसांत दरांत क्विंटलमागे १५०० रुपयांची घसरण
दररोज सकाळी महाविद्यालयात जाताना गोरेगाव ते मालाड असा प्रवास करावा लागतो. घरी परतताना दुपारी बसमध्ये प्रचंड गर्दी असते. अनेकदा सगळे प्रवासी बसमध्ये चढण्यापूर्वीच ती सुरू केली जाते. धावती बस पकडण्याच्या प्रयत्नात प्रवासी तोल जाऊन पडण्याची शक्यता असते. त्यामुळे किमान बेस्ट प्रशासनाने बसगाड्यांची संख्या वाढवावी.
वैष्णवी उतेकर, विद्यार्थिनी