मुंबई : पादचाऱ्याच्या अपघाती मृत्यू प्रकरणी २३ वर्षांपूर्वी बेस्टच्या बसचालकाला झालेली शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द करून त्याची निर्दोष सुटका केली. हा चालक बेदरकार किंवा निष्काळजीपणे गाडी चालवून संबंधित पादचाऱ्याच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याचा कोणताही पुरावा पोलीस सादर करू शकलेले नाहीत नाहीत, अशी टिप्पणीही न्यायालयाने य़ाचिकाकर्त्याला दिलासा देताना केली. त्याचवेळी, या शिक्षेच्या आधारे याचिकाकर्त्याला सेवेतून निलंबित किंवा बडतर्फ करण्यात आले असल्यास त्याला पुन्हा सेवेत रुजू करण्यात यावे. परंतु, याचिकाकर्ता सेवानिवृत्त झाला असल्यास त्याला सेवानिवृत्तीचे लाभ देण्यात यावेत, असे आदेशही न्यायालयाने बेस्ट प्रशासनाला दिले आहेत.
शिवाजी कर्णे या बेस्ट बस चालकावर बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे गाडी चालवून एका पादचाऱ्याच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी खटला चालवण्यात आला होता. तसेच, त्यांना त्यांच्यावरील सर्व आरोपांत दोषी ठरवण्यात आले होते. मात्र, कर्णे हे वेगात बस चालवत होते आणि त्यांनी सिग्नल तोडल्याचे एकाही साक्षीदाराने साक्षीदरम्यान सांगितलेले नाही. त्यामुळे, हा अपघात बेदरकार आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्याने झाला हे सिद्ध करण्यात पोलीस अपयशी ठरल्याचेही न्यायमूर्ती मिलिंद जाथव यांच्या एकलपीठाने कर्णे यांची निर्दोष सुटका करताना नमूद केले.
हेही वाचा : दोन दिवसांत मुंबईतील १३ विमानांत बॉम्ब ठेवल्याची धमकी, तपासणीत सर्व धमक्या खोट्या असल्याचे निष्पन्न
या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला हे कोणीही नाकारलेले नाही. परंतु बेदरकारपणे वाहन चालवण्याशी संबंधित कोणतेही पुरावे नसताना याचिकाकर्त्याला दोषी ठरवणे न्याय्य आणि योग्य नाही, असेही न्यायमूर्ती जाधव यांच्या एकलपीठाने आदेशात स्पष्ट केले. अपघातानंतर पळून न जाता याचिकाकर्त्याने मृत व्यक्तीला स्वत: रुग्णालयात नेले होते. मात्र, या बाबीकडे न्यायदंडाधिकारी आणि सत्र न्यायालयाने पूर्णपणे दुर्लक्ष केले. याउलट, हा अपघात बेस्ट बस चालकाकडून झाल्याची आणि अपघातात एका पादताऱ्याचा मृत्यू झाल्याची एकमेव बाब न्यायदंडाधिकारी आणि सत्र न्यायालयाने विचारात घेऊन कोणत्याही पुराव्याविना याचिकाकर्त्याला त्याच्यावरील आरोपांत दोषी ठरवले. तसेच, त्याला शिक्षा सुनावल्याचे एकलपीठाने आदेशात नमूद केले.
न्यायदंडाधिकाऱ्यांनी कर्णे यांना २००१ मध्ये बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे गाडी चालवून पादचाऱ्याच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोषी ठरवले होते व तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. दोन महिने तुरूंगवास भोगल्यानंतर याचिकाकर्त्याची जामिनावर सुटका झाली होती. सत्र न्यायालयानेही २००२ मध्ये याचिकाकर्त्याला सुनावलेली शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर, याचिकाकर्त्याने शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
प्रकरण काय ?
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, २ डिसेंबर १९९७ रोजी कर्णे हे चिरा बाजारकडून क्रॉफर्ड मार्केटच्या दिशेने बस चालवत होते. परंतु, सिग्नलवर वळण घेत असताना रस्ता ओलांडणाऱ्या एका व्यक्तीला त्यांच्या बसने धडक दिली. कर्णे आणि वाहकाने लागलीच जखमी झालेल्या पादचाऱ्याला नजीकच्या रुग्णालयात नेले, परंतु, पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यानंतर, कर्णे याच्यावर बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे बस चालवून एकाच्या मृत्युस जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा : म्हाडा मुंबई मंडळ सोडत ऑक्टोबर २०२४ : २०१७ पैकी ४०० हून अधिक घरे परत, तर १५३० विजेत्यांची घरासाठी स्वीकृती
असाही दिलासा
अपघाताच्या वेळी याचिकाकर्ते हे ३२ वर्षांचे होते आणि आता त्यांचे वय ५८ वर्षे आहे. त्यामुळे, दोषसिद्धीच्या निकालामुळे याचिकाकर्त्याला सेवेतून निलंबित किंवा बडतर्फ केले गेले असल्यास, त्याला थकीत वेतनासह पुन्हा सेवेत सामावून घ्यावे. परंतु, कर्णे हे निवृत्त झाले असतील, तर बेस्ट उपक्रमाने त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीचे विस्तारीत लाभ त्यांना द्यावेत, असेही आदेश न्यायालयाने दिले.