मुंबई : बेस्ट उपक्रमातील विद्युत पुरवठा विभागातील एका कर्मचाऱ्याचा शनिवारी १२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता सातरस्ता येथील जेकब सर्कल विद्युत बिल भरणा केंद्रावर कार्यरत असताना हृदय विकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाला. म्हात्रे यांच्या मृत्यूनंतर बेस्टच्या विद्युत विभागातील रिक्त पदांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कामगार सेनेने पदभरती तत्काळ करण्याची मागणी केली आहे.
बेस्ट उपक्रमाच्या विद्युत पुरवठा विभागातील कर्मचारी राजेश म्हात्रे यांचा १२ एप्रिल रोजी कामावर असताना मृत्यू झाल्यामुळे बेस्ट कामगारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. बेस्ट उपक्रमाच्या ढिसाळ नियोजनाचा हा बळी असल्याचा आरोप बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केला आहे. म्हात्रे यांच्या मृत्यू नंतर नियमानुसार त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला बेस्ट तत्काळ पुढील एका महिन्यात सामावून घेण्यात यावे ही मागणी देखील सामंत यांनी केली आहे
विद्युत विभागातील रिक्त पदांचा प्रश्न ऐरणीवर…
बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागातील वीज बिल भरणा केंद्रावर वीज बिल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. बेस्टमध्ये गेल्या काही वर्षात जसजसे कर्मचारी निवृत्त झाले तसतशी नवीन भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक पदे रिक्त असून अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे मुंबईतील सुमारे ६० टक्के वीज बिल भरणा केंद्र बंद केले आहेत. त्यामुळे वीज भरणा केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा असतात आणि नागरिक बिल जास्त आले किंवा अजून काही तक्रार असेल तर त्यांचा रोष वीज बिल भरणा केंद्रावरील कर्मचाऱ्यावर काढतात. वादावादीचे प्रसंग इथे उद्भवतात. तसेच कर्मचारी कमी असल्याने या विभागातील कर्मचारी वर्गास रोज वेगवेगळ्या वीज बिल भरणा केंद्रावर अधिकारी पाठवत असतात. त्यामुळे विद्युत विभागातील कर्मचारी तणावाखाली असतात, अशी प्रतिक्रिया सामंत यांनी दिली आहे.
१ मे पासून आंदोलनाचा इशारा …
बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागात विद्युत नियामक आयोगाच्या (एमईआरसी) नियमानुसार तत्काळ कर्मचारी भरती करावी अशी मागणी बेस्ट कामगार सेनेने केली आहे. ही कर्मचारी भरती करण्याचे आदेश मुंबई महापालिका प्रशासनानेही बेस्ट उपक्रमाला दिले आहेत. मात्र अद्यापही ही भरती झालेली नाही, असाही आरोप सामंत यांनी केला आहे. त्यामुळे पुढील ३० एप्रिलपर्यंत जर बेस्ट प्रशासनाने विद्युत पुरवठा विभागात आयुक्तांच्या आदेशानुसार व एमईआरसीच्या नियमानुसार सर्व पदे तत्काळ भरली नाहीत तर दिनांक १ मे पासून महाराष्ट्र कामगार दिनी बेस्टच्या नियोजन शून्य अधिकारी वर्गास तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा बेस्ट कामगार सेनेने दिला आहे.