भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सलग दुसऱ्या दिवशी उपनगरातील नालेसफाईची पाहणी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही ओशिवरा परिसरातली नाल्यांची सफाई होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते.शेलार यांनी अंधेरी, वर्सोवा येथील नाल्यांची पाहणी केली. पश्चिम उपनगरातील इर्ला नाल्याची पाहणी केली असता अद्याप काम पूर्ण झालेले नाही. तसेच जीवन नगर नाल्यात अद्याप गाळाचे थर, फ्लोटींग मटेरियल कायम असून पालिका अधिकारी सांगत असलेले आकडे आणि प्रत्यक्षातील चित्र यात तफावत दिसून आल्याचे आमदार ॲड आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >>> पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीला मुहूर्त मिळेना
यावेळी स्थानिक नगरसेवक अभिजित सामंत आणि पदाधिकारी तसेच पालिका अधिकारी उपस्थितीत होते. निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर त्वरित दुसऱ्या दिवसापासून भाजपची सगळी यंत्रणा आता नालेसफाईवर लक्ष ठेवून आहे. झालेल्या कामांबाबत आम्ही समाधानी नाहीत. मालमत्ता करासाठी मुंबईकरांच्या खिशात हात घालणारी पालिका नाल्यात हात घालण्यात अपयशी ठरली आहे, असे शेलार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष आज कुठे आहे ? नाल्यावर का दिसत नाही ? मुंबईकरांसाठी का बोलत नाही? उद्धव ठाकरे आणि मविआचं मुंबईवरील प्रेम हे पूतना मावशीचे आहे. त्यांना मुंबई, मुंबईकर, मराठी माणूस फक्त मतदानाच्या वेळेस आठवतो. त्याच्यासाठी काम, सेवा आणि देखरेख करताना ते परागंदा असतात, अशी टीकाही शेलार यांनी केली.
हेही वाचा >>> ‘सीएसएमटी’ स्थानकालगत फेरीवाल्यांचा ठिय्या, प्लास्टिक कचऱ्याकडे ‘क्लिन अप मार्शल’चे दुर्लक्ष
मनसेचा आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लोकप्रतिनिधींनी गुरुवारी ओशिवरा परिसरातील नाल्याची पाहणी केली. या नाल्यांवरील कचरा अद्याप तसाच असून हा नाला लवकर साफ झाला नाही तर येत्या पावसाळ्यात या परिसरातील लोकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आठ दिवसात नाला साफ झाला नाही तर पालिका अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आंदोलन करू असा इशारा वर्सोवा येथील विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी दिला आहे.