मुंबई : औषध वितरकांची ५० टक्के देयके पुढील दोन आठवड्यांमध्ये, तर उर्वरित देयके १५ फेब्रुवारीपर्यंत मंजूर करण्यात येतील, असे लेखी आश्वासन मुंबई महानगरपालिकेने औषध वितरकांना दिले. त्यामुळे सोमवारपासून बंद केलेला औषध पुरवठा मंगळवारपासून पुन्हा पूर्ववत करण्याचा निर्णय ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स हाेल्डर फाऊंडेशनने जाहीर केला. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालये व उपनगरीय रुग्णालयांमध्ये निर्माण होणारा औषध आणीबाणी टळली.
मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या वितरकांची देयके मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. यामुळे या वितरकांवर आर्थिक संकट कोसळले होते. देयके मंजूर करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. त्यामुळे ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडशन या वितरकांच्या संघटनेअंतर्गत वितरकांनी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांना करण्यात येणारा औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. यामुळे सर्व वैद्यकीय महाविद्यालये व उपनगरीय रुग्णालयांमध्ये औषध आणीबाणीची शक्यता निर्माण झाली होती. या परिस्थितीची दखल घेत मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विपीन शर्मा यांनी उपायुक्त व वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, लेखा परीक्षक, दक्षता पथक यांची तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये प्रमुख रुग्णालयांकडे औषधांची सुमारे २० कोटी रुपयांची देयके, दक्षता अनुपालनासाठीची सुमारे ५ कोटी रुपये, तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सुमारे ३५ कोटी रुपये अशी एकूण ६० कोटी रुपयांची देयके प्रलंबित असल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा…३०५ विजेत्यांची आठ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात, पत्राचाळ योजनेतील घरांना निवासी दाखला
रुग्णालयातील रुग्णांना औषध पुरवठा सुरळीत व्हावा व त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी ५० टक्के देयके पुढील दोन आठवड्यामध्ये मंजूर करण्याचे, तसेच उर्वरित देयके १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता व लेखा विभागाला दिल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून ऑल फूड व ड्रग लायसन्स होल्डर फाऊडेशनला पत्राद्वारे कळवले आहे. औषध वितरकांची देयके मंजूर करण्याचे संथ गतीने सुरू असलेले काम जलदगतीने करण्यात येईल. भविष्यातही देयके शक्य तितक्या वेळेवर मंजूर करण्यात येतील, असे आश्वासन पत्राद्वारे दिले आहे.
हेही वाचा..परराज्यातील रक्त हस्तांतरणावरील बंदी उठवली
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार मंगळवारी तातडीने सर्व रुग्णालयांचा औषध पुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय वितरकांनी घेतला.अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड व ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशन