मुंबई : मुंबईत वाहनांची संख्या वाढत असून वाहनतळांची संख्या कमी पडू लागली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने मुंबईत चार ठिकाणी भूमिगत बहुस्तरीय यांत्रिकी (मल्टिलेवल रोबोटिक) वाहनतळ उभारण्याचे ठरवले आहे. त्यापैकी हुतात्मा चौकातील अप्सरा पेन शॉपजवळील भूमिगत बहुस्तरीय यांत्रिकी सार्वजनिक भूमिगत वाहनतळाचे काम सुरू झाले आहे.
मुंबईतील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाहनतळेही अपुरी पडू लागली आहेत. कुठेही, कशीही वाहने उभी करून ठेवलेली असल्यामुळे वाहतूक कोंडीही होऊ लागली आहे. वाहनांची संख्या वाढू लागल्यामुळे वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देणे हे पालिकेपुढील मोठे आव्हान आहे. पालिकेने काही वर्षांपूर्वी महालक्ष्मी येथील भुलाबाई देसाई रोड परिसरात स्वयंचलित बहुमजली वाहनतळ सुरू केले होते. त्याच धर्तीवर मुंबईत आणखी चार ठिकाणी भूमिगत बहुस्तरीय यांत्रिकी वाहनतळ (मल्टिलेवल रोबोटिक पार्किंग) सुरू करण्याचे ठरवले आहे. त्यापैकी माटुंगा आणि मुंबादेवी येथील कामे रखडली आहेत. मात्र हुतात्मा चौक येथील वाहतळाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे.
दक्षिण मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी हुतात्मा चौकातील अप्सरा पेन शॉपजवळील भूमिगत बहुस्तरीय रोबोटिक सार्वजनिक वाहनतळाचे नुकतेच भूमिपूजन केले. या वाहनतळासाठी पालिका ७० कोटी रुपये खर्चं करणार आहे. या वाहनतळामध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पॉइंट्स असावेत, अशी मागणी मकरंद नार्वेकर यांनी केली आहे. या वाहनतळाची सेवा आणि देखभाल कंत्राटदाराने करावी आणि अशा सुविधांवरील दोष दायित्व कालावधी ६० वर्षांचा असावा, अशीही सूचना त्यांनी केली आहे. मुंबईत अशा आणखी भूमिगत वाहनतळाची गरज आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
काळा घोडा आणि रिगल सिनेमाजवळही अशी आणखी भूमिगत वाहनतळे तयार उभारण्याची गरज आहे. या दोन्ही भागात दिवसा पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. तसेच या भागाचे सौंदर्यीकरण आणि अनुषंगिक कामे सुरू आहेत. त्यामुळे, या ठिकाणी भूमिगत वाहनतळाचे काम सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मत नार्वेकर यांनी व्यक्त केले.
हुतात्मा चौकातील वाहनतळ कसे असेल…
या स्वयंचलित वाहनतळामध्ये १९४ गाड्या उभ्या करण्याची क्षमता आहे. या वाहनतळामुळे मुंबई उच्च न्यायालय आणि लगतच्या परिसरातील नागरिकांची वाहनतळाची मागणी काही अंशी पूर्ण होईल. हुतात्मा चौकातील सुविधेमध्ये चार भूमिगत स्तर असतील. वाहनतळात वाहने उदवाहनाद्वारे (लिफ्ट) प्रवेश करतील. बहु-स्तरीय यांत्रिकी वाहनतळातून वाहन मिळवण्यास सुमारे तीन मिनिटे लागतील.