मुंबई : मुंबईतील विविध प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावरील कामावर देखरेख ठेवण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने सचेत हे मोबाईल ॲप तयार केले आहे. ते १ ऑक्टोंबरपासून हे ॲप वापरात येणार आहे. मात्र पालिकेतील अभियंते या ॲपला विरोध करू लागले असून ॲप न वापरण्याचे आवाहन अभियंत्यांच्या संघटनेने केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने भौगोलिक माहिती तंत्रज्ञानावर (जीआयएस) आधारित मायबीएमसी सचेत ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे. विभाग कार्यालयातील परिरक्षण (मेंटेनन्स), घनकचरा व्यवस्थापन, इमारत आणि कारखाना विभागाच्या संबंधित कामावर देखरेख ठेवण्यासाठी हे ॲप तयार करण्यात आले आहे. पालिकेचे अनेक अभियंते हे क्षेत्रीय कामावर (फिल्ड वर्क) असतात. या क्षेत्रीय कामाची वास्तविक स्थिती जाणून घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मायबीएमएसी सचेत ॲप्लिकेशन तयार केले आहे. त्यांच्याकडून केल्या जाणाऱया कामकाजामधील पारदर्शकता, विश्वसनीयता आणि क्षेत्रीय कामकाजाच्या व्यवस्थापनात सुधारणा व्हावी, या उद्देशाने सध्या हे मोबाईल ॲप्लिकेशन प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आले आहे. दिनांक १ ऑक्टोबर पासून ते संबंधित कर्मचाऱ्यांसाठी पूर्णवेळ उपलब्ध असेल.

हेही वाचा : सव्वा दोन कोटींच्या फसवणूकी प्रकरणी केतन पारेखसह महिलेविरोधात गुन्हा

त्या अंतर्गत विविध प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावरील परिरक्षण (मेंटेनन्स), घनकचरा व्यवस्थापन, इमारती आणि कारखाना विभागाच्या कामकाजांशी संबंधित कर्मचारी आणि अधिकारी यांनी त्यांच्या दैनंदिन कामाचा तपशील छायाचित्रांसह नोंदवायचा आहे. काम पूर्ण झाल्यानंतर त्यासंबंधित माहिती आणि छायाचित्रे अपलोड करून काम पूर्ण झाल्याची नोंद करायची आहे. त्यामुळे, त्यांच्याकडे सुरू असलेले काम, त्यांनी पूर्ण केलेले काम आणि कामाची सद्यस्थिती आदींची माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.

दरम्यान, या ॲपला पालिकेतील कनिष्ठ व दुय्यम अभियंत्यांनी विरोध केला आहे. पालिका प्रशासनाने आधी अभियंत्यांची रिक्त असलेली एक हजार पदे भरावी, अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी केली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षात अभियंत्यांची भरतीच झालेली नाही. त्यामुळे अभियंत्यांवर आधीच कामाचा ताण आहे. त्यामुळे ॲप मार्फत अभियंत्यावर देखरेख ठेवण्याच्या या निर्णयाला विरोध असल्याचे राजाध्यक्ष यांनी सांगितले.

हेही वाचा : तरुणांमधील उच्च कोलेस्टेरॉल पातळी देते भविष्यातील हदयविकारांना आमंत्रण!

या प्रकरणी म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशननेदेखील पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. बऱ्याचवेळा लोकप्रतिनिधी हे विभागातील कामांसाठी अभियंत्यांना बोलवतात. तसेच पालिका अधिकाऱ्यांचे दौरे, बैठका यांनाही हजेरी लावावी लागते. या ॲपमध्ये कनिष्ठ अभियंत्यांनाच केंद्रस्थानी का ठेवले आहे. अभियंत्यांना प्रशासन सुशिक्षित वेठबिगार बवनू पाहते आहे का असा सवाल संघटनेने पत्रात केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai bmc engineers oppose sachet app which is used to supervise department level works mumbai print news css