मुंबई : वातावरणीय बदलामुळे हवेच्या दर्जात होणारे बदल, त्यातून जनजीवनावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेऊन महानगरपालिकेने बांधकामांसंदर्भात कठोर पावले उचलली आहेत. महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे विकासकांना अपरिहार्य आहे. तसेच, वायू प्रदूषण पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत भायखळ्यातील बांधकाम प्रकल्पांवरील निर्बंध कायम राहतील. वारंवार सूचना देऊनही निकषांची पूर्तता न करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बुधवारी दिले.
मुंबई महानगरातील वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी महानगरपालिकेने कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ज्या परिसरांत हवा गुणवत्ता निर्देशांक ‘वाईट’ अथवा ‘अतिवाईट’ श्रेणीत आहे, तेथील बांधकामे सरसकटपणे बंद करण्यात आली आहेत. यामध्ये भायखळा आणि बोरिवली पूर्व परिसराचा प्रामुख्याने समावेश आहे. बांधकामे थांबविल्यानंतर प्रत्यक्ष ठिकाणी काय स्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी भूषण गगराणी यांनी बुधवारी भायखळा येथील बांधकाम प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली. बांधकामाधीन इमारतीला चहूबाजूंनी हिरवे कापड, ज्युट, ताडपत्रीने पूर्णपणे झाकून बंदिस्त करावे, बांधकाम प्रकल्पाभोवती किमान २५ फूट उंचीचा पत्रा किंवा धातूचे आच्छादन असावे, बांधकामांच्या ठिकाणी असलेल्या राडारोड्याची तातडीने विल्हेवाट लावावी, प्रकल्पस्थळी बेवारस वाहने असू नयेत, प्रकल्पस्थळी ये-जा करणाऱ्या वाहनांची चाके नियमितपणे धुवावी, त्यासाठी आवश्यक यंत्रणा विकासकांनी उभारणे गरजेचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे संबंधित प्रकल्पांमध्येही वायू प्रदूषण मोजणारी व वायू प्रदूषण नियंत्रण करणारी सर्व यंत्रणा कार्यान्वित असणे सक्तीचे आहे. सर्व यंत्रणा व उपाययोजना कार्यान्वित झाल्या म्हणून विशिष्ट प्रकल्पाला लगेच बांधकाम सुरू करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे गगराणी यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा…Raj Thackeray: ‘समस्या आली की मनसेची आठवण, पण मतदानावेळी विसर’, राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत
संत गाडगे महाराज चौक (सात रस्ता) परिसरातील दोन खासगी इमारत बांधकाम प्रकल्पांना गगराणी यांनी भेट दिली. तसेच, मुंबई सेंट्रल परिसरात बांधकामाधीन असलेल्या मेट्रो ३ प्रकल्पाचे ठिकाण, माझगाव येथील जोसेफ बाप्टिस्टा उद्यानाजवळील डोंगरबाबा येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणि याच ठिकाणी असलेली बेकरीची पाहणी त्यांनी केली. त्याचप्रमाणे बाप्टिस्टा उद्यानालगत केंद्र शासनाच्या भूविज्ञान मंत्रालयाअंतर्गत आणि भारतीय उष्णदेशीय हवामान शास्त्र संस्था (पुणे) व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या ‘सफर’ हवामान केंद्राचीही गगराणी यांनी पाहणी केली. यावेळी ई विभागाचे सहायक आयुक्त सुरेश सागर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.