मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ, मोबाइल अॅप आणि मोबाइल संदेश अशी तिहेरी संपर्क यंत्रणा अपयशी ठरल्यानंतर यावेळी महापालिकेने मुंबईकरांना माहिती पुरवण्यासाठी टि्वटर अकाऊंटला हात घातला आहे. ‘बृहन्मुंबई मनपा MCGM’ या नावाने @MCGM_BMC हे टि्वटर हँडल सुरू करण्यात आले आहे. सध्या या हँडलवर एकही टिे्वट करण्यात आले नसून, हँडलची चाचणी सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या जनसंपर्क अधिका-यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

मुसळधार पावसाच्या आपत्कालीन स्थितीत पालिकेचा संपर्क तुटला

गेल्या आठवडय़ात मुंबईचे तळे झालेले असताना व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने नागरिकच एकमेकांना सूचना देत होते. इतकंच नव्हे तर वृत्तवाहिन्यांनी नागरिकांना पुरवलेल्या पावसाच्या अपडेट्सबाबत आयुक्त अजय मेहता यांनी पत्रकार परिषदेत वाहिन्यांचे अभिनंदन करून या विषयाला बगल दिली होता. मात्र या सगळ्यात ३० हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेली पालिका नागरिकांशी संपर्क साधण्यात कशी अपयशी ठरली याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. त्यानंतर सर्व समाजमाध्यमांवर नागरिकांनी महापालिकेच्या नालेसफाई आणि खड्डेमुक्त मुंबई मोहिमेची पुरती लाज काढली होती. टि्वटरवर तर #MumbaiRains हा हॅश टॅग पहिल्या क्रमांकावर ट्रेड करत होता. त्यामध्ये मुंबई महापालिका मुंबईकरांच्या शिव्या-शापांचे धनी ठरली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेचेच टि्वटर हँडल सुरू झाल्याने मुंबईकरांना अडचणींच्या प्रसंगात थेट पालिकेकडून माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे. तसेच नागरिकांनाही आपल्या समस्या थेट त्यांच्यापर्यंत पोहचवता येतील. संकेतस्थळ, मोबाइल अॅप आणि मोबाइल संदेशाच्या अपयशी प्रयोगानंतर हा प्रयोग कितपत यशस्वी ठरणार हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.