भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचे मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात उभारण्यात आलेले शिल्प ( मेटल आर्ट) हटविण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आले आहेत. येत्या २४ तासांमध्ये हे शिल्प हटविण्यात यावे, अन्यथा कोणत्याही क्षणी कारवाई करण्यात येईल, असे पालिकेने शिल्पाची उभारणी करणाऱ्या आरपीजी फाऊंडेशनला पाठविलेल्या स्मरणपत्रात म्हटले आहे.
यापूर्वीही आरपीजी फाऊंडेशनला मुंबई हेरिटेज संवर्धन समितीने नोटीस बजावली होती. मात्र त्याचे पालन न झाल्यामुळे पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे. मरीन ड्राईव्ह हा परिसर ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित करण्यात आला असून या परिसराचा युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थानांमध्येदेखील समावेश आहे. त्यामुळे याठिकाणी पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही बांधकाम करण्यास बंदी आहे. त्यामुळेच सप्टेंबर २०१५ मध्ये नरिमन पॉईंट आणि चर्चगेट रहिवाशी संघाने या शिल्पाकृतीबाबत पालिकेकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, आरपीजी फाऊंडेशननेही ही शिल्पकृती अन्यत्र हलवण्याची तयारी दाखवली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा