Hit and Run Case Update in Marathi : वरळी येथे बीएमडब्ल्यू या अलिशान गाडीने ४५ वर्षीय महिलेला धडक देऊन तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मिहीर शाहला पोलिसांनी विरार येथून ९ जुलै रोजी सायंकाळी अटक केली. अपघात झाल्यानंतर त्याने पलायन केले होते. गेले तीन दिवस पोलीस त्याच्या मागावर होते. परंतु, त्याचा फोन बंद असल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. परंतु, गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या शोधमोहिमेनंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर त्याची आई आणि दोन मोठ्या बहिणांनीही मुरबाड येथून ताब्यात घेण्यात आलं आहे.
अपघात झाल्यानंतर मिहीर तीन दिवसांपासून फरार होता. अपघातानंतर तो गोरगाव येथील त्याच्या प्रेयसी घरी पळाला. त्यामुळे मिहीरची एक बहीण पूजा तत्काळ गोरेगाव येथे गेली. तिथून पूजाने मिहिरला बोरिवलीला आणलं. त्यानंतर मिहीर आणि त्याच्या दोन बहिणी आणि आई मीना हे ठाणे, नाशिकजवळ आणि मुरबाड येथील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये लपून बसले होते.
मिहीर शाहला पोलिसांनी कसं पकडलं?
मिहिरने त्याचा आणि त्याच्या मित्रांचा मोबाईल बंद ठेवला होता. त्यामुळे पोलिसांना त्यांचं लोकेशन ट्रॅक करणं अवघड गेलं. मिहिर शाह त्याच्या मित्र आणि कुटुंबीयांसोबत शहापूरमधील एका रिसॉर्टमध्ये थांबले होता. परंतु, थोड्या वेळाने मिहीर त्याच्या मित्रांबरोबर घरच्यांना न सांगताच विरारला पळाला. दरम्यान, मिहीरच्या मित्राने त्याचा मोबाईल मंगळवारी सकाळी १५ मिनिटांसाठी सुरू केला अन् पोलिसांनी तत्काळ त्यांचं लोकेशन ट्रॅक केलं. यामुळे पोलिसांनी तत्काळ वेगाने त्यांची सुत्रे हलवली आणि मिहीरला विरार येथून अटक केली.
नेमका अपघात कसा घडला?
मिहीरने वरळी कोळीवाड्यात राहणाऱ्या कावेरी नाखवा या महिलेला रविवारी सकाळी ५.२५ वाजता धडक दिली. त्यानंतर सुमारे दोन किलोमीटर दूर त्यांना फरफटत नेले. अपघातापूर्वी आरोपीने मद्यप्राशान केल्याचा संशय आहे. दरम्यान, याप्रकरणी यापूर्वी मिहीरचे वडील राजेश शाह आणि चालक राजऋषी बिडावत यांना अटक केली होती. राजेश शाह यांना जामीन मिळाला असून बिडावतला मंगळवारी न्यायालयाने ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिहीरला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
मिहीरला आज शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी त्याच्या सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार, न्यायालयाने त्याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा >> Worli Hit and Run Case : मिहीर शाहला १६ जुलैपर्यंत कोठडी; कोर्टात दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तीवाद
मिहीरच्या रक्तात अल्कोहोल
मिहीरला अटक केल्यानंतर त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. अपघातापूर्वी त्याने मद्यप्राशन केल्याचे ठोस पुरावे पोलिसांकडे असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.